राजकीय पक्षांकडून तक्रारींचा पाढा
By Admin | Updated: February 15, 2017 00:37 IST2017-02-15T00:36:50+5:302017-02-15T00:37:08+5:30
बैठक : मुख्य निवडणूक निरीक्षकांनी घेतला आढावा

राजकीय पक्षांकडून तक्रारींचा पाढा
नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी येत्या २१ फेबु्रवारीला घेण्यात येणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने नेमलेले मुख्य निवडणूक निरीक्षक व राज्याचे कौशल्य आणि उद्योजकता विकास विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर यांनी विविध राजकीय पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणूकविषयक अडचणी जाणून घेतल्या. यावेळी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी इव्हीएमपासून ते बूथ स्थलांतरणाबाबतच्या विविध तक्रारींचा पाढा कपूर यांच्यासमोर वाचला.
मुख्य निवडणूक निरीक्षक दीपक कपूर यांच्या उपस्थितीत महापालिका मुख्यालयात राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली. यावेळी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर, मनसेचे माजी आमदार नितीन भोसले, राष्ट्रवादीचे गजानन शेलार, कॉँग्रेसचे नगरसेवक शाहू खैरे, माजी उपमहापौर गुलाम शेख, माकपाचे श्रीधर देशपांडे आदि उपस्थित होते. यावेळी कॉँग्रेस व मनसेने जुन्या नाशिकमधील प्रभाग क्रमांक १३ मध्ये एकूण १४ मतदान केंद्रांच्या स्थलांतरणाचा मुद्दा उपस्थित केला. सदर बूथ हे दूर अंतरावर ठेवण्यात आल्याने मतदानावर परिणाम होण्याची भीती शरद अहेर, शाहू खैरे, नितीन भोसले यांनी व्यक्त केली. यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी व आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी याबाबत पाहणी करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. तसेच एका इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवर काही प्रभागात दोन प्रवर्गाच्या मतपत्रिका दिल्या जाणार असल्याने मतदारांचा गोंधळ उडणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. प्रामुख्याने, ग्रामीण भागात अशी व्यवस्था होणार असल्याने चिंता व्यक्त करण्यात आली. परंतु, याबाबत राज्य निवडणूक आयोगाशी चर्चा करूनच अंतिम निर्णय होईल, असे दीपक कपूर यांनी स्पष्ट केले. यावेळी भाजपाने उमेदवारी वाटपप्रसंगी घेतलेल्या दोन लाख रुपयांबाबत आणि भाजपाच्याच पदाधिकाऱ्याने दहा लाख रुपयांबाबत केलेल्या वक्तव्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काय कारवाई झाली, याची विचारणाही कॉँग्रेस-मनसे व राष्ट्रवादीने केली. त्यावेळी कपूर यांनी आचारसंहिता कक्षाकडून चौकशी सुरू असल्याचे सांगितले. यावेळी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी काही सूचनाही केल्या. निवडणूक निरीक्षक म्हणून उपआयुक्त पी. बी. वाघमोडे, नंदुरबारचे अपर जिल्हाधिकारी अनिल पाटील, उपआयुक्त डॉ. संजय कोलते आणि नगरचे अपर जिल्हाधिकारी बी. एच. पालवे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.