विकासकामे होत नसल्याची तक्र ार
By Admin | Updated: May 17, 2016 01:04 IST2016-05-17T00:13:38+5:302016-05-17T01:04:18+5:30
दिंडोरी नगरपंचायत : मासिक बैठकीत नागरी सुविधांचे नियोजन

विकासकामे होत नसल्याची तक्र ार
दिंडोरी : नगरपंचायतीने प्रशस्त कार्यालयासोबतच विविध नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत विकास आराखडा आखत शहराचे जुने रूप बदलण्याचा संकल्प केला आहे.
नगरपंचायतीची मासिक बैठक नगराध्यक्ष भाऊसाहेब बोरस्ते यांच्या अध्यक्षतेखाली झाली. नगरसेवकांनी सुचवलेली कामे होत नसल्याची तक्रार महिला बालकल्याण समिती सभापती शैला उफाडे, रत्नाबाई बोरस्ते, नियोजन समिती सभापती रचना जाधव, रोहिणी पगारे यांनी केली.
पाणीपुरवठा समिती सभापती कैलास मवाळ, स्वीकृत नगरसेवक चंद्रकात राजे, माधव साळुंके, तुषार वाघमारे यांनीही कामे होत नसल्याची तक्रार केली. मुख्याधिकारी संगीता नांदुरकर यांनी दोन दिवसात कामे मार्गी लावत असल्याचे सांगितले. मागील ४० कामांपैकी ३५ कामे मार्गी लागली असून, उर्वरित कामे तांत्रिक बाबींमुळे अडली असल्याचा खुलासा त्यांनी केला. नगरपंचायतीचे कार्यालय हायटेक करण्याचा मनोदय बोरस्ते, उपनगराध्यक्ष सचिन देशमुख यांनी व्यक्त केला.
दिंडोरी शहराचा चेहरा बदलण्यासाठी जुन्या टपऱ्यांचे आधुनिकीकरण करण्याबाबत सचिन देशमुख, चंद्रकांत राजे यांनी चर्चा केली. सर्व टपरीधारकांशी चर्चा करून लवकरच नवीन व्यापारी संकुलाचा आराखडा तयार करण्याचे ठरवण्यात आले.
नवीन संकुल अथवा रो हाऊस करताना बिल्डरांकडूनच अटींची पूर्तता करून घ्यावी, असेही ठरविण्यात आले. शिवाजीनगर प्रभाग २ मध्ये नवीन जलवाहिनी टाकण्याचा ठराव झाला. वारस नोंदी, मजूर संस्थांना कामे देणे, दोन लाखापर्यंतची कामे नगरपंचायत अभियंत्यांना अधिकार देणे, शिवाजीनगर येथील गट क्र . ३६, ३७ मधील जागा धर्मादाय रुग्णालयाला देणे, अनुकंप तत्त्वावर वारसांना नोकरी देण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. (वार्ताहर)