वजन पावतीत तफावत असल्याची तक्रार
By Admin | Updated: March 2, 2017 00:43 IST2017-03-02T00:43:16+5:302017-03-02T00:43:32+5:30
मालेगाव : व्यापारी व समितीच्या मापारी शेतकऱ्यांची फसवणूक करीत असल्याची तक्रार कांदा उत्पादक शेतकरी तुषार बच्छाव यांनी बाजार समितीचे सचिव अशोक देसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

वजन पावतीत तफावत असल्याची तक्रार
मालेगाव : मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुंगसे कांदा खरेदी-विक्री केंद्रावरील वजन काट्यावर वजन केल्यानंतर प्रत्यक्ष काटा पावतीत कमी वजन दाखविले जात आहे. व्यापारी व समितीच्या मापारी शेतकऱ्यांची फसवणूक करीत असल्याची तक्रार कांदा उत्पादक शेतकरी तुषार बच्छाव यांनी बाजार समितीचे सचिव अशोक देसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बच्छाव हे मुंगसे खरेदी केंद्रावर ट्रॅक्टर क्रमांक एमएच ४१ एफ १८५ मध्ये कांदा विक्रीसाठी घेऊन गेले होते. त्यांच्या कांद्याला ५६७ रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. लिलाव झाल्यानंतर त्यांनी ट्रॅक्टरसह कांद्याचे वजन केले. ७१ क्विंटल ३५ किलो वजनातून ट्रॅक्टर व ट्रॉलीचे ३६ क्विंटल ३० किलो वजन वजा करून कांद्याचे केवळ ३५ क्विंटल ५ किलो वजन भरले. त्यांना मात्र काटाधारकांनी केवळ ३३ क्विंटल ५ किलोची पावती दिली. तब्बल दोन क्विंटलचा प्रत्यक्ष वजन व पावतीतील वजनात तफावत दिसून आली. बच्छाव यांनी संबंधितांकडे तक्रार केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. त्यांच्यासह इतर शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याची तक्रार करीत या प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी बच्छाव यांनी केली आहे. (प्रतिनिधी)