कपालेश्वर ट्रस्ट कार्यालय तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल
By Admin | Updated: May 22, 2016 22:34 IST2016-05-22T22:32:35+5:302016-05-22T22:34:35+5:30
कपालेश्वर ट्रस्ट कार्यालय तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल

कपालेश्वर ट्रस्ट कार्यालय तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल
पंचवटी : भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई श्री कपालेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी आल्या असता देसाई यांनी मंदिरात प्रवेश करू नये यासाठी विरोध दर्शविण्यासाठी जमलेल्या जमावातील सात ते आठ संशयितांनी ट्रस्टच्या कार्यालयात अनधिकृतपणे प्रवेश करून कार्यालयातील सीसीटीव्ही, संगणक, कॅमेरा व टेबल खुर्च्यांची मोडतोड करून विश्वस्तांना शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांत सात ते आठ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्री कपालेश्वर ट्रस्टचे विश्वस्त अॅड. भाऊसाहेब गंभीरे यांनी याबाबत पंचवटी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. गुरुवारी दुपारी देसाई या कपालेश्वर मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. त्या ट्रस्टच्या कार्यालयात विश्वस्तांबरोबर चर्चा करत असताना जमावाने आरडाओरड करून त्यांना मंदिरात जाण्यासाठी विरोध केला, त्यानंतर सायंकाळच्या सुमारास देसाई ह्या ट्रस्टच्या कार्यालयातून बाहेर पडताच सात ते आठ संशयितांनी ट्रस्टच्या कार्यालयात प्रवेश करून आतील कॅमेरा, टेबल, खुर्च्यांची मोडतोड करून कागदपत्रे असलेली फाईल पळविली तसेच कार्यालयात असलेले ट्रस्टी गंभीरे व प्रमोद देसाई या दोघांना धक्काबुक्की करून मारहाण करत शिवीगाळ केली होती. याबाबत गंभीरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रात्री उशिरा पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय कार्यालयात धुडघूस माजविणाऱ्या संशयितांची नावे पोलिसांना मिळाली असून त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करणार आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश सपकाळे यांनी सांगितले. (वार्ताहर)