कृषी विभागात गैरव्यवहार झाल्याची तक्रार
By Admin | Updated: December 8, 2015 23:23 IST2015-12-08T23:23:12+5:302015-12-08T23:23:26+5:30
कृषी विभागात गैरव्यवहार झाल्याची तक्रार

कृषी विभागात गैरव्यवहार झाल्याची तक्रार
येवला : तालुका कृषी विभागाच्या वतीने पाच वर्षांत झालेल्या राष्ट्रीय कृषी योजनेअंतर्गत विविध कामात गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पवार यांनी केला आहे. कृषी विभागातील पाच वर्षातील कामांची गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकामार्फत चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पवार यांनी केली आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हा कृषी अधिकारीपासून जलसंपदा, जलसंधारणमंत्री यांच्यापर्यंत पाठवण्यात आल्या आहेत.
सन २०१० ते २०१३ या कालावधीत तालुक्यात ठिबक सिंचन योजना राबविण्यात आली. अधिकारी व संबंधित ठेकेदार यांनी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देताना त्यांच्या सातबारावर दोन एकराची नोंद असताना दुप्पट ते तिप्पट नोंद दाखवून संगनमताने गैरव्यवहार केला असल्याचे म्हटले आहे. योजना राबविताना अधिकाऱ्यांच्या मर्जीतील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देताना खऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांना या लाभापासून वंचित ठेवण्यात आले. कांदा चाळ योजनेत नजीकच्या लाभार्थींना त्यांच्याकडे असलेल्या जुन्या चाळी दाखवून लाभ देण्यात आला. त्यामुळे गरजू शेतकऱ्यांवर अन्याय झाला. याशिवाय सीमेंट साखळी बंधारे, मनरेगा व महात्मा फुले जलभूमी अभियानांतर्गत शेततळे, संरक्षक भिंती, गाळ काढणे या योजनांमधून झालेल्या कामात सर्रासपणे अधिकाऱ्यांनी टक्केवारी घेतली असल्याचा आरोप निवेदनात संभाजीराजे पवार यांनी केला आहे. (वार्ताहर)