तक्रार करणाऱ्यांना ‘मातोश्री’वर प्रवेश बंद
By Admin | Updated: July 31, 2016 00:59 IST2016-07-31T00:54:28+5:302016-07-31T00:59:51+5:30
तक्रार करणाऱ्यांना ‘मातोश्री’वर प्रवेश बंद

तक्रार करणाऱ्यांना ‘मातोश्री’वर प्रवेश बंद
सिडको : शिवसैनिक ते पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनी एकदिलाने, एकसंघ राहून पक्षाचे काम करावे. नाशिकमध्ये टाचणी जरी पडली तरी मातोश्रीवर समजते. यासाठी यापुढील काळात मातोश्रीवर तक्रारींना वाव नसून तत्त्व, मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकसंघ राहून विरोधकांना नेस्तनाबूद करावे, असे आवाहन शिवसेना सचिव व खासदार अनिल देसाई यांनी केले.
सिडकोतील प्रभाग ४७ मध्ये शिवसेनेचे नगरसेवक सुधाकर बडगुजर व हर्षा बडगुजर यांच्या विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी देसाई बोलत होते. खासदार देसाई म्हणाले शिवसेना निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जनतेची कामे करीत नसून सत्ता असली किंवा नसली तरी सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी शिवसैनिक हा त्याचे कार्य सुरूच ठेवतो, असे सांगून भाजपा सरकारने वेगळा विदर्भाचा मुद्दा उपस्थित करून, खरे दात दाखविण्यास सुरुवात केली असली तरी शिवसेनेची भूमिका ही अखंड महाराष्ट्राचीच असून, यासाठी यापुढील काळातही शिवसेना शांत बसणार नाही, असेही ते म्हणाले. सिडको मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये शत-प्रतिशत म्हणणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्या व नाशिक महापालिकेत एक हाती सत्ता आणण्यासाठी सर्वांनी मतभेद विसरून एकदिलाने कामाला लागावे, असेही शेवटी खासदार देसाई यांनी सांगितले. शिवसेना उपनेते बबन घोलप, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी प्रभागात केलेल्या कामांची यादी सादर केली व भविष्यात प्रभागातील पाणीप्रश्न भेडसावू नये यासाठी भूमिगत जलकुंभ उभारल्याने पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याचे सांगितले.
यावेळी व्यासपीठावर आमदार राजाभाऊ वाजे, अनिल कदम, योगेश घोलप, जयंत दिंडे, सुहास कांदे, भाऊलाल तांबडे, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, माजी महापौर विनायक पांडे, मामा ठाकरे, महिला आघाडीच्या अॅड. शामला दीक्षित, माजी सिडको प्रभाग सभापती कल्पना पांडे, दीपक बडगुजर आदि उपस्थित होते.
सूत्रसंचालन दीप्ती देशमुख यांनी, तर स्वागत नगरसेवक हर्षा बडगुज यांनी केले. आभार दीपक बडगुजर व मयुरेश बडगुजर यांनी मानले. कार्यक्रमास नाशिक पश्चिम मतदारसंघ प्रमुख प्रवीण तिदमे, उपमहानगरप्रमुख सुनील पाटील, माजी नगरसेवक सीमा बडदे, दिलीप दातीर, सुभाष गायधनी, श्याम साबळे, माणिक सोनवणे, दादाजी अहिरे, नाना पाटील, बी. एल. श्रीवास्तव, राजेंद्र नानकर, बारकू शेलार, पवन मटाले, पिंटू भामरे, योगेश पवार, राम सूर्यवंशी, युवराज दराडे, अंकुश शेवाळे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)