गतवर्षीच्या तुलनेत कॉपीच्या प्रकारात झाली घट
By Admin | Updated: April 3, 2017 01:37 IST2017-04-03T01:35:52+5:302017-04-03T01:37:23+5:30
नाशिक : महाष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत गेल्या वर्षीच्या तुलनेत कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण घटले आहे.

गतवर्षीच्या तुलनेत कॉपीच्या प्रकारात झाली घट
नाशिक : महाष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत गेल्या वर्षीच्या तुलनेत कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण घटले आहे. रागेल्या वर्षी बारावी परीक्षेत नाशिकमधून १३८ कॉपीची प्रकरणे समोर आली होती, तर यावर्षी केवळ ९४ विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाल्याने नाशिक शिक्षण मंडळाने कॉपीमुक्त अभियनाच्या दिशेने टाकलेले हे यशस्वी पाऊल ठरले आहे.
बारावीच्या परीक्षेसाठी विभागातील ६५ हजार ६४६ विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेसाठी, तर ७३,०२७ कला व वाणिज्य शाखेच्या २२,३९७ अशा एकूण एक लाख ६८ हजार २८७ विद्यार्थ्यांनी नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या चार जिल्ह्यांतील ९५२ महाविद्यालयांतील २१८ केंद्रांवर परीक्षा दिली. या परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी शिक्षण विभागाच्या नऊ भरारी पथकांची यंदा परीक्षांवर करडी नजर होती.
यात शिक्षणाधिकाऱ्यांच्या पथकाने नाशिकमधून २७, जळगावला २०, धुळे ४७ व नंदुरबारमध्ये केवळ एक असे विभागातून एकूण ९४ विद्यार्थ्यांना कॉपीच्या प्रकरणात पकडले आहे. गेला वर्षीच्या तुलनेत हा आकडा ३८ ने कमी आहे. गेल्या वर्षी मार्च २०१६ च्या बारावी परीक्षेत नाशिकमधून ५३, धुळे जिल्ह्यातून २२, जळगावमधून ५१ व नंदुरबारमधून ६ असे एकूण १३८
कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांवर शिक्षण विभागाने कारवाई केली होती.
यावरून गेल्या वर्षीच्या तुलनेत कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण घटले असून, कॉपीमुक्त अभिनाच्या दृष्टीने नाशिक शिक्षण मंडळाचीही यशस्वी वाटचाल असल्याचे मत शैक्षणिक वर्तुळातून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)