भाजपाच्या सत्तेला दलबदलूंचा आधार

By Admin | Updated: February 25, 2017 00:51 IST2017-02-25T00:50:48+5:302017-02-25T00:51:03+5:30

१६ नगरसेवक विजयी : सेनेपेक्षा भाजपाला सर्वाधिक लाभ

Communist Party of the BJP | भाजपाच्या सत्तेला दलबदलूंचा आधार

भाजपाच्या सत्तेला दलबदलूंचा आधार

नाशिक : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सुमारे ४५ हून अधिक नगरसेवकांनी पक्षांतर करत कुणी सेना-भाजपाची, तर कुणी कॉँग्रेस-राष्ट्रवादी-मनसेची वाट चोखाळली. परंतु, या दलबदलूंचा सर्वाधिक लाभ भाजपाला झाला आहे. भाजपाकडून दहा दलबदलू नगरसेवक निवडून आले, तर शिवसेनेकडून पाच जणांची लॉटरी लागू शकली आहे.  महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा-आठ महिन्यांपासून पक्षांतराचा खेळ सुरू होता. मनसेसह कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे लचके तोडण्यासाठी सेना-भाजपात जणू काही स्पर्धा लागली होती. दर पंधरवड्याला कुणी मातोश्रीवर गंडाबंधन करून घेत होते, तर कुणी वसंतस्मृतीसह मंत्रालयाची पायरी चढत भगवा ध्वज हाती घेत होते. या पक्षांतराचा सर्वाधिक फटका महापालिकेत सत्ताधारी असलेल्या मनसेला बसला होता. मनसेच्या ४० पैकी तब्बल ३० नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. त्यात शिवसेनेकडे मनसेच्या सर्वाधिक नगरसेवकांनी प्रवेश केला. त्याखालोखाल भाजपाला पसंती दिली. महापालिका निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांमध्ये उलथापालथ झाली. कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्याही काही नगरसेवकांनी पक्षांतर केले.  पक्षांतर केलेल्या सर्वच नगरसेवकांना उमेदवारी मिळाली नाही. एकूण ७९ पैकी पुन्हा निवडून येणाऱ्या नगरसेवकांची संख्या ३८ राहिली, तर ४१ नगरसेवक पराभूत झाले. त्यात विजयी ३८ नगरसेवकांमध्ये १४ नगरसेवक हे दलबदलू होते, तर पराभूत झालेल्या ४१ नगरसेवकांपैकी १८ नगरसेवक हे दलबदलू होते. नाशिककरांनी निवडणुकीच्या तोंडावर राजकीय सोय पाहत पक्षांतर केलेल्यांना नाकारल्याचे दिसून येते. जे काही दलबदलू निवडून आले त्यातही काही स्वत:च्या वैयक्तिक कामगिरीवर विजयी झाले, तर काही दलबदलूंना नवसंजीवनी लाभली. भाजपाकडून दहा, तर सेनेकडून पाच आणि एक अपक्ष दलबदलूंना पुन्हा महापालिकेत जाण्याची संधी लाभली.
विजयी झालेले दलबदलू
उद्धव निमसे (भाजपा), विमल पाटील (अपक्ष), शशिकांत जाधव (भाजपा), शिवाजी गांगुर्डे (भाजपा), समीना मेमन (राष्ट्रवादी), अर्चना थोरात (भाजपा), रंजना बोराडे (शिवसेना), संगीता गायकवाड (भाजपा), कोमल मेहरोलिया (भाजपा), रमेश धोंगडे (शिवसेना), कल्पना चुंभळे (शिवसेना), सुवर्णा मटाले (शिवसेना), रत्नमाला राणे (शिवसेना), दीपाली कुलकर्णी (भाजपा), सतीश कुलकर्णी (भाजपा) व रुची कुंभारकर (भाजपा).
पराभूत झालेले दलबदलू
परशराम वाघेरे (शिवसेना), दामोदर मानकर (भाजपा), योगीता अहेर (शिवसेना), माधुरी जाधव (भाजपा), यतिन वाघ (शिवसेना), गुलजार कोकणी (कॉँग्रेस), नंदिनी जाधव (शिवसेना), पवन पवार (अपक्ष), मंदा ढिकले (अपक्ष), अशोक सातभाई (शिवसेना), हरिष भडांगे (अपक्ष), कन्हैया साळवे (भाजपा), रेखा बेंडकुळे (भाजपा), शीतल भामरे (शिवसेना), सुदाम कोंबडे (भाजपा), रशिदा शेख (अपक्ष), संजय चव्हाण (अपक्ष) व ज्योती गांगुर्डे (मनसे).

Web Title: Communist Party of the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.