घंटागाडी कामगारांच्या समर्थनासाठी समिती

By Admin | Updated: November 17, 2015 23:28 IST2015-11-17T23:27:17+5:302015-11-17T23:28:05+5:30

१७ दिवसांपासून संघर्ष : गुन्हे मागे घेण्याची मागणी

Committee for the support of garbage workers | घंटागाडी कामगारांच्या समर्थनासाठी समिती

घंटागाडी कामगारांच्या समर्थनासाठी समिती

नाशिक : किमान वेतनासाठी संघर्ष करणाऱ्या घंटागाडी कामगारांचा गेल्या १७ दिवसांपासून संघर्ष सुरूच असून, अद्याप त्यावर तोडगा निघालेला नाही. आंदोलकांना समर्थन देण्यासाठी शहरातील पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन घंटागाडी कर्मचारी आंदोलनासाठी समर्थन समिती स्थापन केली आहे. आंदोलन कामगारांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी या समितीने केली आहे.
यापूर्वीही या कामगारांना नियमित वेतन, थकीत वेतन, बोनस आणि अन्य विषयांवर वेळोवेळी आंदोलने करावी लागली आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता आंदोलन तीव्र करण्यासाठी श्रमिक सेवा संघाने ३० तारखेपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे.
गेल्या १० तारखेला कामगारांनी कन्नमवार पूल, सातपूर आणि नाशिकरोड येथील घंटागाडी पार्किंगच्या ठिकाणी आंदोलन केले. त्यानंतर कामगार कामावरही हजर होते; परंतु महापालिकेने या सर्वांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे शहरातील स्वातंत्र्य सैनिक तसेच डाव्या चळवळीतील अनेकांनी एकत्र येऊन शहर स्वच्छतेचे काम करणाऱ्या या कामगारांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठीच घंटागाडी कर्मचारी आंदोलन समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या कामगारांवर गुन्हे दाखल करून त्यांना नोकरीतून कमी करण्याचा डाव असल्याचे समितीचे म्हणणे असून, या कामगारांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक वसंतराव हुदलीकर, शांताराम चव्हाण, सुनील मालुसरे, अरुण दोंदे, संतोष जाधव, विजय बागुल, अ‍ॅड. राजपाल राणा, प्रा. निकिता मोरे, ज्योती अटकडे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Committee for the support of garbage workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.