गतिमान लोकाभिमुख सेवा देण्यास कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:43 IST2021-02-05T05:43:27+5:302021-02-05T05:43:27+5:30

नाशिक : नागरिकांची शासकीय कार्यालयातील कामे वेळेत होण्यासाठी, तसेच शासनाच्या योजनांचा व्यापकपणे लाभ घेता यावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ई-ऑफिस, ...

Committed to providing dynamic people oriented service | गतिमान लोकाभिमुख सेवा देण्यास कटिबद्ध

गतिमान लोकाभिमुख सेवा देण्यास कटिबद्ध

नाशिक : नागरिकांची शासकीय कार्यालयातील कामे वेळेत होण्यासाठी, तसेच शासनाच्या योजनांचा व्यापकपणे लाभ घेता यावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ई-ऑफिस, नाशिक मित्र वेबपोर्टल व ऑनलाइन आरटीएस या सेवांचे लोकार्पण करण्यात आले. या ऑनलाइन प्रणालीच्या माध्यमातून नागरिकांना गतिमान, पारदर्शक व लोकाभिमुख सेवा देण्यासाठी जिल्हा प्रशासन वचनबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

पोलीस संचलन मैदान येथे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, खासदार डॉ. भारती पवार, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, नाशिक महानगपालिकेचे आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व सामान्य नागरिक उपस्थित होते.

यावेळी भुजबळ म्हणाले, जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून, कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही लक्षणीय आणि आशादायी आहे. त्यात आपल्या जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, महापालिका, जिल्हा परिषद प्रशासन तसेच आरोग्य प्रशासन यांचे अहोरात्र परिश्रम असल्याचे त्यांनी नमूद केले. नागरिकांची शासकीय कार्यालयातील कामे नागरिकांचा हक्क म्हणून व्हावीत यादृष्टीने शासनाने लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत अधिसूचित केलेल्या वीस सेवांच्या व्यतिरिक्त स्वतःहून अतिरिक्त ८० सेवा आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिल्या जातात. या कायद्याअंतर्गत गेल्या वर्षभरात साडेदहा लाखांहून अधिक सेवा देऊन जिल्हाधिकारी कार्यालयाने एक उच्चांक प्रस्थापित केला आहे.

जिल्ह्यातील दोन्ही महानगरपालिका नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी व शहर विकासासाठी कटिबद्ध असून, नाशिक महापालिकेला नुकताच शहर स्वच्छतेच्या संदर्भातील ओडीएफ प्लस प्लस दर्जा प्राप्त झालेला आहे, असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य हे एक कृषिप्रधान, उद्यमशील आणि लोकसेवेमध्ये अग्रेसर राज्य आहे. राज्यातील सर्वच घटकांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने शासन व प्रशासनातील सर्व घटकांनी एकत्र येऊन आपले प्रजासत्ताक अधिक मजबूत करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

याप्रसंगी पालकमंत्र्यांच्या हस्ते वीरपत्नीस ताम्रपटाने सन्मानित करण्यात आले. तसेच जिल्हा क्रीडा पुरस्कार, उल्लेखनीय कामगिरी बजावणारी रुग्णालये स्मार्ट ग्रामपंचायती, पोलीस पत्नी व कुटुंबीयांचा सत्कार, शिष्यवृत्ती पुरस्कार, सामाजिक वनीकरण विभागाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

Web Title: Committed to providing dynamic people oriented service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.