आत्महत्त्या करू; पण जागा देणार नाही

By Admin | Updated: August 3, 2014 02:00 IST2014-08-03T00:52:42+5:302014-08-03T02:00:20+5:30

आत्महत्त्या करू; पण जागा देणार नाही

Commit suicide; But will not give up space | आत्महत्त्या करू; पण जागा देणार नाही

आत्महत्त्या करू; पण जागा देणार नाही

 

नाशिक : आगामी कुंभमेळ्यासाठी शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी घेऊ दिल्या जाणार नाही अगदी भाड्यानेदेखील देणार नाही, असे सांगतानाच तपोवन परिसरातील शेतकऱ्यांनी आत्महत्त्या करू; पण जागा देणार नाही असा इशाराच दिला. शनिवारी दौऱ्यावर आलेल्या महंत ग्यानदासजी यांना त्यांनी साकडे घातले. त्यांनीही शेतकऱ्यांच्या बाजूनेच असल्याचे सांगत जमिनीची गरज भासली तर शेतकऱ्यांच्या संमतीनेच ती मिळवू असे सांगितले.
कुंभमेळ्यासाठी ३२५ एकर जागा उपलब्ध केली जाणार आहे. त्यापैकी ५७ एकर जागा महापालिकेच्या ताब्यात असून, उर्वरित जागेसाठी भूसंपादनाची तयारी सुरू झाली आहे. तथापि, शेतकऱ्यांचा त्यास विरोध आहे. शनिवारी साधू-महंत आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या दौऱ्यापूर्वीपासून उभ्या असलेल्या शेतकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्तकेल्या. यापूर्वी रामवाडी येथे साधुग्राम वसवले जात होते; परंतु ते आता तपोवनापर्यंत आले आहे. गेल्या कुंभमेळ्याच्या वेळी शेतकऱ्यांच्या जागा आरक्षित करण्यात आल्या आणि त्यावर आता इमारती उभ्या राहिल्याने अन्य शेतकऱ्यांच्या जागा ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू आहेत, असे मधुकर जेजूरकर यांनी सांगितले. साधुग्रामसाठी आरक्षण टाकताना माजी खासदार तसेच काही परप्रांतीय साधुंच्या आश्रमाच्या जागा वगळून शेतकऱ्यांच्या पिकाऊ जमिनींवर आरक्षण टाकण्यात आले आहे. उदरनिर्वाहाचे साधन हटविण्याचा प्रयत्न कोणी सहन करणार नाही, असे सांगताना जेजूरकर यांनी आत्महत्त्या करू; परंतु जमिनी देणार नाही असे सांगितले. कुंभमेळ्यात तीन महिन्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात येणाऱ्या साधू-महंतांसाठी जागा आरक्षित केल्या जातात. साधुग्राम वसवताना त्यात गटारी, रस्ते, पाइपलाइन टाकण्यात येते. शौचालयांचे बांधकाम करण्यात येते. त्यामुळे कुंभमेळा संपल्यानंतरही शेतकऱ्यांच्या शेतात खडी, सीमेंट असल्याने तीन महिने पीक घेता येत नाही, त्यामुळे एक वर्ष शेतीचे भाडे राज्य शासनाने दिले तरी त्याचा उपयोग होत नाही असे त्यांनी सांगितले. शिवाजी गवळी यांनीही शेतकऱ्यांना दहापट टीडीआर देऊ असे सांगता सांगता प्रत्यक्षात मात्र कोणत्याही प्रकारे मोबदला दिलेला नाही, असे सांगून जागा देण्यास विरोध केला. यावेळी महंत ग्यानदास यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी शेतजमिनी नकोच आहेत, गरज भासल्यास शेतकऱ्यांना विनंती करून त्यांच्या संमतीनेच जमिनी घेतल्या जातील असे त्यांनी सांगितले. यावेळी एकनाथ गिते, प्रकाश शिंदे, रामभाऊ सूर्यवंशी, दामोदर जेजूरकर, रामदास जेजूरकर यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Commit suicide; But will not give up space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.