कार्यशाळेत आयुक्तांचे मार्गदर्शन
By Admin | Updated: October 22, 2016 00:04 IST2016-10-22T00:03:50+5:302016-10-22T00:04:38+5:30
कळवण : तालुका स्वच्छतेसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन

कार्यशाळेत आयुक्तांचे मार्गदर्शन
कळवण : नाशिक तालुक्यापाठोपाठ कळवण तालुका हगणदारीमुक्त करण्यासाठी पंचायत समितीसह तहसील, कृषी, आरोग्य, शिक्षण, महिला व बालकल्याण यांसह सर्व विभागांची जबाबदारी व कर्तव्य असून, सर्वांनी एकजुटीने काम करून नागरिकांशी सुसंवाद साधावा. स्वच्छता ही काळाची गरज असल्याचे ओळखून पाऊले उचलावी व नोव्हेंबरअखेर कळवण तालुका स्वच्छ व हगणदारीमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन नाशिकचे विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले यांनी केले.
पंचायत समिती कळवण येथील सभागृहात गुरुवारी (दि. २०) सर्व विभागप्रमुख व कर्मचाऱ्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी महसूल आयुक्त एकनाथ डवले होते. बैठकीला नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, सहायक जिल्हाधिकारी गंगाथरण डी., तहसीलदार कैलास चावडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे (पा. व स्व.) आदि शासकीय अधिकारी उपस्थित होते. ज्या ठिकाणी मानसिकता बदलणे अवघड आहे तेथे पोलीस ठाणे व तलाठी यांच्या सहकार्याने प्रसंगी कठोर पावले प्रशासनाने उचलावीत, असे आदेश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी बैठकीत देऊन कळवण तालुका हगणदारीमुक्त करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन करून प्रस्तावित ३३ गावांच्या संपर्क अधिकाऱ्यांसह ग्रामसेवकांकडून गावातील शौचालय बांधकाम प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी स्वच्छ भारत अभियानाच्या कामकाजाचा माहितीपट कळवणचे गटविकास अधिकारी तुकाराम सोनवणे यांनी सादर केला. कळवण तालुका हगणदारीमुक्त आढावा बैठकीसाठी उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, सहायक गटविकास अधिकारी शिवाजी जाधव, कळवणचे पोलीस उपअधीक्षक देवीदास पाटील, पोलीस निरीक्षक संजय घाटगे, तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल आढे व बशीर शेख, परिवहन महामंडळ आगार व्यवस्थापक प्रदीप आहिरे यांच्यासह कळवण तालुक्यातील सर्व विभागप्रमुख व क्षेत्रीय कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सूत्रसंचालन तहसीलदार कैलास चावडे यांनी केले. (वार्ताहर)