पोलीस-पालिका आयुक्तांमध्ये खडाजंगी
By Admin | Updated: March 16, 2015 00:44 IST2015-03-16T00:44:52+5:302015-03-16T00:44:59+5:30
पालकमंत्र्यांसमोर प्रकार : अतिक्रमण काढण्यास पोलीस बळ मिळत नसल्याची तक्रार

पोलीस-पालिका आयुक्तांमध्ये खडाजंगी
नाशिक : गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी शनिवारी रात्री पालकमंत्री गिरीश महाजन यांनी घाईघाईने शासकीय विश्रामगृहावर बोलाविलेल्या बैठकीत आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अतिक्रमण प्रश्नावर चर्चा येऊन ठेपली तेव्हा पुरेसा पोलीस बंदोबस्त उपलब्ध होत नसल्याचे कारण पुढे आल्यानंतर पोलीस आयुक्त आणि पालिका आयुक्त यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. पालकमंत्र्यांच्या समक्ष हा प्रकार घडल्यानंतरही पोलीस आयुक्तांनी आपला नन्नाचा पाढा चालूच ठेवल्याने अन्य उपस्थित अधिकारी व लोकप्रतिनिधीही अवाक् झाले.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई महापालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सुरू केली. त्यानुसार गंगापूररोड, कॉलेजरोड, इंदिरानगर परिसर, पाथर्डी फाटा, पेठरोड पंचवटी आदि भागात मोहीम राबविण्यात आल्याने अनेकांनी कारवाईच्या भीतीने स्वत:हून अतिक्रमणे काढून घेतली. त्यानंतर महापालिकेने शहरातील सुमारे साडेतीन हजार अनधिकृत बांधकामांवर रेड मार्किंग करून ठेवले आहे. पालिका आयुक्तांच्या या मोहिमेचे स्वागत झाले, तसेच धनदांडग्यांची अतिक्रमणे न हटविल्याबद्दल टीकाही झाली. याशिवाय आमदार देवयानी फरांदे यांनी द्वारका येथील वाढत्या अतिक्रमणाचा मुद्दा उचलून धरल्याने पालिकेवर शहरातील अतिक्रमण हटविण्यासंबंधी दबाव वाढतो आहे. त्यानुसार महापालिकेकडून पोलीस आयुक्तांकडे अतिक्रमण हटविण्यासंबंधी वारंवार पोलीस बंदोबस्ताची मागणी केली जाते; परंतु कधी व्हीआयपींचे दौरे तर कधी सण-उत्सवामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुढे करत बंदोबस्त देण्यास टाळाटाळ केली जाते. शनिवारी रात्री पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल आणि पालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम दोन्हीही हजर होते. यावेळी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर रस्ते मोकळे करण्याचा प्रश्न चर्चेला आला त्यावेळी पालिका आयुक्तांनी पोलीस बंदोबस्त उपलब्ध होत नसल्याचे पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे अतिक्रमण मोहीमही थांबली असल्याचे सांगण्यात आले.
पालिका आयुक्तांच्या खुलाशानंतर पालकमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना जाब विचारला तेव्हा पोलीस आयुक्तांनी बंदोबस्त देता येणार नसल्याचे सांगितले. मोहिमेसाठी पालिकेकडे सध्या १५ पोलीस कर्मचारी असून, आणखी ५० पोलीस कर्मचारी मिळाले, तरी मोहीम सुरू ठेवता येईल, असा युक्तिवाद पालिका आयुक्तांनी केल्यानंतर पालकमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना बंदोबस्त देण्याची सूचना केली. तरीही पोलीस आयुक्तांचा ताठा कायम राहिला.
शहरात साडेतीन हजार पोलीस कर्मचारी असताना पन्नास कर्मचारी देण्यास काय हरकत आहे, अन्यथा ग्रामीण विभागाकडून पोलीस कर्मचारी मागवून घ्या, असा सल्ला पालकमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना दिला तरीही पोलीस आयुक्तांनी वेगवेगळी कारणे पुढे करत नन्नाचा पाढा कायम ठेवला. यामुळे वातावरण काहीसे तापले.
सध्या सिंहस्थामुळे पोलीस कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण चालू असल्याने कर्मचारी उपलब्ध करून देता येत नसल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले; परंतु त्या उत्तराने ना पालिका आयुक्तांचे समाधान झाले ना पालकमंत्र्यांचे. अखेर पालकमंत्र्यांनी एप्रिलमध्ये पोलीस बंदोबस्त देण्याची सूचना करत चर्चेची गाडी दुसऱ्या विषयांकडे वळविली आणि हा विषय थांबला. (प्रतिनिधी)