अंधेरी रातो में आयुक्त सुनसान राहोंपर...
By Admin | Updated: July 29, 2016 00:43 IST2016-07-29T00:37:29+5:302016-07-29T00:43:06+5:30
अंधेरी रातो में आयुक्त सुनसान राहोंपर...

अंधेरी रातो में आयुक्त सुनसान राहोंपर...
नाशिक : महापालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रशासकीय कामकाज समजून घेणाऱ्या अभिषेक कृष्ण यांनी रात्रीच्या सुमारास आपल्या खासगी गाडीतून शहराचीही भ्रमंती सुरू केली असून, महापालिकेच्या कामांचीही पाहणी केली जात आहे. त्यामुळे गेडाम यांच्या बदलीनंतर सुटकेचा नि:श्वास सोडलेल्या अधिकाऱ्यांसह ठेकेदारांच्या पोटात पुन्हा एकदा भीतीचा गोळा उठण्याची शक्यता आहे.
चार वर्षांत चार ठिकाणी बदली झालेल्या अभिषेक कृष्ण यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कामकाजाचा फारसा अनुभव गाठीशी नाही. त्यामुळे नाशिकच्या ‘ब’ वर्ग महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती आल्यानंतर अभिषेक कृष्ण यांनी ताकही फुंकून पिण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दीड वर्षात माजी आयुक्तांच्या कारकीर्दीत झालेल्या अनेक वादग्रस्त निर्णयांकडे सावधपणेच पाहण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. त्यासाठीच गेल्या दोन आठवड्यांपासून प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका बोलावून अभिषेक कृष्ण माहिती जाणून घेत आहेत. त्यातच रात्रीच्या सुमारास आपली ओळख कोठे पटू नये यासाठी त्यांनी खासगी वाहनातून शहराचा फेरफटका मारण्यास सुरुवात केली आहे. त्यातून शहराची ओळख करून घेतानाच महापालिकेमार्फत सुरू असलेल्या कामांचेही निरीक्षण सुरू आहे. अभिषेक कृष्ण यांच्या या पहाऱ्यामुळे प्रशासनातील अधिकारी व मक्तेदार यांची पुन्हा एकदा झोप उडण्याची शक्यता आहे.