कळवण : अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पातून ४०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचा आदेश शनिवारी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी गिरणा नदी खोरे प्रकल्प विभागाला दिला असून, कळवण, देवळा, सटाणा व मालेगाव तालुक्यांचा काहीअंशी पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.महालपाटणे, देवपूरपाडा, लोहोणेर, ठेंगोडा, निंबोळा, धांद्री, ब्राह्मणगाव, लखमापूर, टेहेरे आदि गावांसाठी २५० दशलक्ष घनफूट व सुळे डाव्या कालव्याद्वारे काकाणे, खेडगाव, दरेभणगी, रवळजी, दह्याणे दिगर, भैताणे दिगर, नाळीद, देसराणे, धार्डे दिगर, पिळकोस, मोकभणगी, खडकी, भादवण, विसापूर, जयदर या गावांकरिता ५० दशलक्ष घनफूट पाणी बिगर सिंचनासाठी आवर्तन देणे शक्य असल्याचा अहवाल यांना सादर केला. जिल्हाधिकारी कुशवाह यांनी शनिवारी पुनंद प्रकल्पातून ४०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचे आदेश गिरणा नदी खोरे प्रकल्प विभागाला दिले. रविवारी (दि. २४) रोजी सदर पाणी सोडण्यात येणार आहे. सुळे डाव्या कालव्यातूनही १०० दशलक्षघनफूट पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.ओझरखेड व पुणेगाव कालव्यातून, चणकापूर उजवा कालवा व गिरणा उजवा कालव्यातून पाणी सोडण्याबाबत तसेच चणकापूर उजव्या कालव्यातून भेंडी पाझर तलाव भरावा व अर्जुनसागर (पुनंद)मधून सुळे डाव्या कालव्याला पाणी सोडून पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याबाबत आमदार डॉ. राहुल अहेर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँक संचालक केदा अहेर व जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कुशवाह यांची भेट घेऊन पाणी मागणीचे ठराव देऊन निवेदन दिले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी गिरणा नदी खोरे प्रकल्प विभागाला पाणी सोडण्याबाबत अहवाल सादर करण्याच्या सूचना देत पाणी सोडण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला होता. याबाबत गिरणा नदी खोरे प्रकल्प विभागाने अहवाल सादर करून ४०० दशलक्ष घनफूट पाणी बिगर सिंचन आवर्तनासाठी देणे शक्य असल्याने पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. आमदार राहुल अहेर, केदा अहेर व नितीन पवार यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. (वार्ताहर)
पुनंदमधून पाणी सोडण्याचे आदेश
By admin | Updated: January 23, 2016 22:31 IST