या आणि नजरेत साठवा... सरकारवाड्याचे वस्तुसंग्रहालय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:15 IST2021-09-26T04:15:27+5:302021-09-26T04:15:27+5:30
नाशिक : नाशिकला प्राचीन व पुरातन असा वारसा लाभलेला आहे. धार्मिक व ऐतिहासिकदृष्ट्या या शहरात सरकारवाडा अर्थात जुना चोपडा ...

या आणि नजरेत साठवा... सरकारवाड्याचे वस्तुसंग्रहालय!
नाशिक : नाशिकला प्राचीन व पुरातन असा वारसा लाभलेला आहे. धार्मिक व ऐतिहासिकदृष्ट्या या शहरात सरकारवाडा अर्थात जुना चोपडा वाडा येथे थाटण्यात आलेले वस्तुसंग्रहालय हे शहराचे वैभव आहे. शासनाच्या आर्थिक मदतीनंतर या वस्तुसंग्रहालयाने कात टाकलेली असून ऐतिहासिक संदर्भ दर्शविणाऱ्या अनेक वस्तू या संग्रहालयात पाहावयास मिळतात. दुर्दैवाने, या वस्तुसंग्रहालयाचे महत्त्व नाशिककरांना उमगलेले नाही. अजूनही या वस्तुसंग्रहालयाची उपेक्षा सुरूच आहे.
नाशिक जिल्ह्याला ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरा लाभली आहे. तसाच पुरातत्वीय अमूल्य ठेवासुद्धा लाभलेला आहे. पूर्वजांनी मागे ठेवलेला हा अमूल्य ठेवा जतन व्हावा व तो जनतेच्या प्रदर्शनार्थ ठेवण्याकरिता एक प्रादेशिक स्वरूपाचे संग्रहालय नाशिकला असावे, अशी खूप वर्षांपासूनची मागणी होती. याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली व १९८५ साली महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालये विभागाच्या अंतर्गत नाशिक येथे प्रादेशिक स्तरावर वस्तुसंग्रहालय स्थापन करण्यात आले.
पूर्वी हेे संग्रहालय सिडकोतील एका भाडेतत्त्वावरील खोलीत अतिशय छोट्या स्वरूपात होते. नाशिक महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर मुंबई-आग्रा महामार्गालगत चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके स्मारकातील एका भव्य दालनात ते स्थलांतरित करण्यात आले. त्यानंतर १८ व्या शतकातील जुन्या पेशवेवाड्याचे अर्थात सरकारवाड्याचे नूतनीकरणासाठी शासनाच्या वतीने १२ व्या व १३ व्या वित्त आयोगांतर्गत सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आणि सरकारवाडा जतन करण्याकरिता त्याची दुरुस्ती सुरू झाली. आता केवळ निधीच्या कमतरतेमुळे पुढील काम थंडावलेले दिसत आहे. अशा या ऐतिहासिक सरकारवाड्यात हे पुराण वस्तुसंग्रहालय सुरू करण्यात आले आहे. या संग्रहालयात प्रदर्शनीय कला वस्तूंमध्ये, पाषाण शिल्पे, धातूशिल्पे, नाणी, रंगचित्रे व छायाचित्रे आदी वस्तूंचा समावेश आहे. बऱ्याचशा काही ऐतिहासिक दुर्मीळ वस्तू या प्रादेशिक विभागातून संकलित केलेल्या आहेत. काही वस्तू या विषयाचे ज्ञान ठेवणाऱ्या काही मान्यवरांनी देखील संग्रहालयास भेटी दिल्या आहेत. त्याचप्रमाणे जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई या शासनाच्या कला संस्थेकडूनही दुर्मीळ अशी ऐतिहासिक शस्त्रास्त्रे या संग्रहालयास मिळालेली आहेत.
याव्यतिरिक्त नाशिकमधील काही व्यक्तींचेही सहकार्य लाभले असून वस्तुसंकलनाचे काम अजूनही या संग्रहालयाद्वारे सुरूच आहे.
सरकारवाड्यातील या प्रादेशिक वस्तुसंग्रहालयात शिल्प दालन, नाणे व धातूशिल्प दालन, रंगचित्रे व छायाचित्रे आदी दालने सुसज्ज असून जनतेच्या प्रदर्शनाकरिता खुली आहेत. मात्र, सध्या कोरोनाचा काळ चालू असल्याने गेल्या दीड वर्षापासून हे पुराणवस्तू संग्रहालय बंद आहे.
कोट...
शासनाच्या पुराण वस्तुसंग्रहालयाची व्याप्ती ही प्रादेशिक स्वरूपाची असून या दालनाशिवाय आदिवासींचे कला वस्तू दालन, हुतात्मा छायाचित्र वस्तू दालन, निसर्ग इतिहास दालन व उत्खननातील पुरातत्व वस्तू अशा चार दालनांची कामे अजून बाकी असून लवकरच ही प्रदर्शन दालने लवकरच खुली होतील.
- आरती आळे, सहायक संचालक, पुरातत्व विभाग, नाशिक
(२४ सरकारवाडा १०,११ फोटो आहेत.)
240921\535925nsk_1_25092021_13.jpg
सरकारवाडा.