कुंभमेळ्यात भारत-चीन संस्कृतीचा मिलाप
By Admin | Updated: September 25, 2015 23:42 IST2015-09-25T23:41:48+5:302015-09-25T23:42:39+5:30
फडणवीस : मानसरोवरातील जल गोदेत प्रवाहित

कुंभमेळ्यात भारत-चीन संस्कृतीचा मिलाप
नाशिक : मानसरोवरातील पवित्र जल त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्तात प्रवाहित केल्याने यंदाचा कुंभमेळ्यात भारत चीन संस्कृतीचा मिलाफ झाल्याचे आणि त्यातून या कुंभाला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाल्याचे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
आॅब्जर्व्हर रिसर्च फाउण्डेशन, महाराष्ट्र सरकार आणि चीन दूतावास यांच्या संयुक्त विद्यमाने ‘होली वॉटर डिप्लोमसी’ अर्थात पवित्र जल राजकीय संस्कृती मिलाफाच्या दृष्टीने मानसरोवरातील पवित्र जल त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्तात तर कुशावर्तातील पवित्र जल अर्थात अमृतकुंभ मानसरोवरात नेण्याचा उपक्रम तिसऱ्या शाही पर्वणीच्या काही तास अगोदर गुरुवारी (दि. २४) रात्री साडेबारा वाजता झाला.. यावेळी सुधींद्र कुलकर्णी, अंजली भागवत, डॉ.विजय भटकर, पालकमंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, आमदार बाळासाहेब सानप यांच्यासह शिष्टमंडळात चिनी दूतावासातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, पहिल्या पर्वणीदरम्यान येथे आलो असता संपूर्ण राज्यावर दुष्काळाचे सावट होते. शुक्रवारी तिसऱ्या पर्वणीच्या वेळी मात्र गोदावरी मातेने आणि वरुणराजाने कृपा केल्याने राज्यावरील दुष्काळाचे सावट काहीसे कमी झाले आहे. सिंहस्थ कुंभमेळा हा खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे.
या पवित्र जल प्रत्यार्पणाच्या उपक्रमातून भारत आणि चीन यांच्यातील संस्कृतीचा मिलाफ होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याचे प्रशासनाने यशस्वी नियोजन केले आणि त्याला नागरिकांनी पुरेशी साथ दिल्यानेच कुंभमेळा निर्विघ्नपणे पार पडत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री दादा भुसे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)