आज होणार रंगांची उधळण...
By Admin | Updated: March 17, 2017 00:57 IST2017-03-17T00:57:25+5:302017-03-17T00:57:39+5:30
आज रंगपंचमी : कोरडे रंग खेळण्यावर भर देण्याचे आवाहन

आज होणार रंगांची उधळण...
नाशिक : फाल्गुन कृष्णपंचमी अर्थात शुक्रवारी (दि.१७) साजऱ्या होणाऱ्या रंगपंचमीसाठी नाशिककर सज्ज झाले आहेत. पारंपरिक रहाडींबरोबरच शहरात सर्वत्र वैयक्तिक, सामूहिक स्वरूपात रंगपंचमी खेळली जाणार असून, त्यासाठी कोरडे, रासायनिक रंग, पिचकाऱ्या, पाणी आदिंची सिद्धता करण्यात आली आहे.
गेल्यावर्षी पाणी टंचाई असल्याने मर्यादीत रंगोत्सवावर मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे शहरातील पेशवेकालीन रहाडही खुले करण्यात आले नव्हते. यंदा मात्र सर्व रहाड खुुले करण्यात आले आहेत. तसेच गाडगे मेनरोडसह विविध ठिकाणी गेल्यावर्षी रेन डान्स बंद ठेवण्यात आले होते. यंदा अनेक ठिकाणी रेन डान्स सुरू होणार आहे. अनेक ठिकाणी रंगोत्सवाच्या आयोजनासाठी इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांनी सज्जता केली आहे. शहरातील सार्वजनिक मंडळांनी डीजेच्या तालावर रंग खेळण्यासाठीदेखील तयारी केली आहे. रंगपंचमीसाठी लागणारे रंग, लहान मुलांसाठी विविध आकारांच्या पिचकाऱ्या आदिंच्या खरेदीसाठी दुकानांवर ग्राहकांची लगबग रात्री उशिरापर्यंत दिसत होती. रंग खेळताना समोरचा दुखावला जाणार नाही, त्याला इजा होणार नाही आणि छोट्याशा खोडीतून मोठे भांडण, वादविवाद उद्भवणार नाही याची काळजी घेत रंगपंचमी खेळावी, असे आवाहन पोलीस यंत्रणेकडून करण्यात आले आहे. तर रासायनिक रंगांऐवजी कोरडे रंग खेळण्याचा सल्ला पर्यावरणवाद्यांनी दिला आहे.