चाहूल थंडीची : विदेशी स्थलांतरित पक्ष्यांचेही दर्शन
By Admin | Updated: November 9, 2015 23:08 IST2015-11-09T23:07:02+5:302015-11-09T23:08:24+5:30
वीस प्रकारच्या पक्ष्यांची नांदूरमधमेश्वरला हजेरी

चाहूल थंडीची : विदेशी स्थलांतरित पक्ष्यांचेही दर्शन
नाशिक : राष्ट्रीय पक्षी अभयारण्याचा दर्जा प्राप्त असलेल्या निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्यातील जलाशयावर सुमारे वीस प्रकारचे देशी-विदेशी पक्षी चालू आठवड्यात पहावयास मिळाल्याचे स्थानिक युवा पक्षी निरीक्षकांनी सांगितले.
खऱ्या अर्थाने नोव्हेंबरपासून थंडीला सुरुवात होऊन पक्षीप्रेमींना पक्ष्यांच्या आगमनाचीही चाहूल लागते. चालू आठवड्यापासूनच नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्यात देशी-विदेशी स्थलांतरित पक्ष्यांचा किलबिलाट कानी पडू लागल्याने यावर्षी मोठ्या प्रमाणात ‘पक्षी संमेलन’ भरणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सद्यस्थितीत सुमारे वीस प्रकारचे पक्षी नांदूरमधमेश्वर अभयारण्यात मुक्तपणे विहार करताना दिसून येत आहेत. यामध्ये काही विदेशी स्थलांतरित पक्ष्यांचाही समावेश आहे. एकूणच नांदूरमधमेश्वर अभयारण्याकडे पक्षी येण्याचे प्रमाण वाढू लागल्याने परिसर पक्ष्यांच्या आवाजाने गजबजू लागला आहे. त्यामुळे पक्षीप्रेमींनाही मोह आवरता येत नसून ‘वीकेण्ड प्लॅन’साठी येथील पक्षी अभयारण्याला हौशी व अभ्यासू पक्षीप्रेमींकडून पसंती दिली जात आहे.
आॅक्टोबर अखेरच्या आठवड्यापासून पक्ष्यांची संख्या अभयारण्यामध्ये वाढू लागल्याचे या भागातील युवा पक्षी निरीक्षक अमोल दराडे, शंकर लोखंडे यांनी सांगितले. सध्या गोदाकाठ पंचक्रोशीत गुलाबी थंडी जाणवू लागली आहे; मात्र चालू महिन्याअखेर थंडीचा प्रभाव अधिक वाढल्यानंतर मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचे थवे अभयारण्यात दाखल होण्याची शक्यता आहे.