थंडीची लागली चाहूल; हवेत वाढला गारवा..
By Admin | Updated: October 27, 2014 00:13 IST2014-10-27T00:00:53+5:302014-10-27T00:13:39+5:30
.कमाल तपमानात घट : कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ढगाळ हवामान; शेकोट्या पेटण्यास प्रारंभ

थंडीची लागली चाहूल; हवेत वाढला गारवा..
नाशिक : एरवी दिवाळीत आपल्या आगमनाची चाहूल देणाऱ्या गुलाबी थंडीने आता कोठे हळूहळू आपले अस्तित्व जाणवून देण्यास सुरुवात केली आहे. सध्या शहराचे किमान तपमान १८ ते १९ अंशांच्या दरम्यान स्थिर असले, तरी गेल्या चार दिवसांत कमाल तपमानात तब्बल आठ अंशांनी घट झाली आहे. त्यामुळे हवेत गारवा जाणवू लागला आहे. दरम्यान, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून चांगली थंडी पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
दिवाळी आणि थंडीचे अतूट नाते आहे. दिवाळीतील पहाटेचे अभ्यंगस्नान गुलाबी थंडीच्या साक्षीनेच केले जाते. यंदाही दिवाळीपासून हवेत गारवा जाणवण्यास सुरुवात झाली असली, तरी थंडी मात्र पडलेली नाही. काही दिवसांपासून शहराच्या कमाल तपमानात मोठी घट झाल्याने गारव्यात वाढ झाली आहे. सध्या शहराचे कमाल तपमान २५ ते ३०, तर किमान तपमान १८ ते १९ अंश सेल्सिअसवर स्थिर आहे. कमाल तपमान घटल्याने थंडीने आपल्या आगमनाची जाणीव करून दिली आहे. त्यामुळे रात्री व पहाटे लोक ऊबदार कपडे परिधान करूनच घराबाहेर पडत आहेत. दरम्यान, सध्या नैऋत्य अरबी समुद्रावर निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, त्याचा थंडीच्या आगमनावरही परिणाम होत आहे; मात्र लवकरच हे वातावरण निवळून थंडी वाढण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)