कॉलेजरोडवरील मोची शोरूमला आग
By Admin | Updated: September 28, 2015 23:37 IST2015-09-28T23:35:59+5:302015-09-28T23:37:50+5:30
अडीच कोटींचे नुकसान : गंगापूर पोलिसांत नोंद

कॉलेजरोडवरील मोची शोरूमला आग
नाशिक : कॉलेजरोडवरील इझी डे मॉलमधील पादत्राणे विक्रीच्या मोची फूटवेअर शोरूमला रविवारी (दि़२७) रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली़ या आगीमध्ये दुकानातील विक्रीच्या मालासह फर्निचरसह जळून खाक झाले असून, सुमारे अडीच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येतो आहे़ सुदैवाने जीवितहानी टळली असून, अग्निशमन दलाच्या सहा बंबांच्या साहाय्याने ही आग विझविण्यात आली़ दरम्यान, ही आग शॉटसर्किटने लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे़
कॉलेजरोडवरील इझी डे मॉलच्या दर्शनीभागात असलेल्या मोची फू टवेअरला रविवारी रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली़ गणेश विसर्जनामुळे या दुकानातील कामगारांना दुपारी दोन वाजताच सुटी देण्यात आली होती़ दुकानातील विक्रीसाठी ठेवण्यात आलेला सर्व माल तसेच फर्निचर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे़ दरम्यान, ही आग लागल्याचे समजताच नागरिकांनी मुख्य अग्निशमन विभागाला माहिती दिली़ त्यानंतर काही मिनिटांतच अग्निशमन विभागाचे सहा बंब व सुमारे ५५ कर्मचाऱ्यांसह विभागप्रमुख अनिल महाजन, तिडके, बैरागी घटनास्थळी दाखल झाले़
आग लागल्यानंतर अग्निशमन विभाग लवकर पोहोचला असला तरी शोरूमला लावलेले कुलूप उघडण्यास विलंब झाल्याने आग भडकली़ दुकानातील लेदरच्या पादत्राणांमुळे मोठ्या प्रमाणात धूर पसरल्याने आग विझविण्यात अडचण आली़ तसेच शोरूममधील पोटमाळ्यात जाण्यासाठी केवळ अरुंद बोळ असल्याने व ती कोसळल्याची शक्यता असल्याने बाहेरून आग विझविण्यासाठी पाण्याचा मारा करण्यात आला़ रात्री दहा वाजता लागलेली आग पहाटे चार वाजेच्या सुमारास आटोक्यात आली़
दरम्यान, सोमवारी दुपारी विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट दिली तसेच व्यवस्थापक सलीम खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)