घोटी परिसरात चालकाला विवस्त्र करून मारहाण
By Admin | Updated: December 1, 2015 23:22 IST2015-12-01T23:21:50+5:302015-12-01T23:22:31+5:30
वाहन पळविले : मुंबई-आग्रा महामार्गावरील घटना

घोटी परिसरात चालकाला विवस्त्र करून मारहाण
घोटी : परिसरात मुंबई-आग्रा महामार्गावर सोमवारी रात्री मुंबईहून नाशिकला येणाऱ्या एका टोयोटा वाहनचालकास काही लुटारूंनी विवस्त्र करत बेदम मारहाण केली, तसेच त्याच्या ताब्यातील टोयोटा वाहनासह मोबाइल व रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत चालकाच्या फिर्यादीवरून घोटी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस चोरी गेलेल्या वाहनाचा आणि लुटारूंचा शोध घेत आहेत.
मुंबईहून नाशिककडे जाणारी टोयोटा (क्र.एमएच १५, ईएक्स २२०) हे वाहन सोमवारी रात्रीच्या सुमारास कल्याण भिवंडी फाटा येथे आले असता, या वाहनात काही अज्ञात इसम आपणास नाशिकला जायचे असल्याचे सांगून गाडीत बसले. वाहनचालक आनंद बापूसिंग परदेशी याने घोटी पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार कथन केला. त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात लुटारूविरु द्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कमलेश बच्छाव, गणेश शेळके, संदीप शिंदे, गणेश सोनवणे आदि करीत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील सुरक्षा व्यवस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी परिसरातील नागरिकांसह वाहन चालकांनी केली आहे. (वार्ताहर)