महाराष्ट्र बँकेच्या अधिकाऱ्यांकडून ग्राहकाच्या दागिन्यांचा अपहार

By Admin | Updated: January 23, 2016 23:59 IST2016-01-23T23:58:37+5:302016-01-23T23:59:56+5:30

नाशिकमध्ये गुन्हा दाखल : साडेपाच लाखांचे सोन्याचे दागिने

Clutter of customer's jewelery by officials of Maharashtra Bank | महाराष्ट्र बँकेच्या अधिकाऱ्यांकडून ग्राहकाच्या दागिन्यांचा अपहार

महाराष्ट्र बँकेच्या अधिकाऱ्यांकडून ग्राहकाच्या दागिन्यांचा अपहार

नाशिक : शरणपूर रोडवरील बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेत एका ग्राहकाने ठेवलेल्या साडेपाच लाखांच्या सोन्याचा बँकेच्या शाखाधिकाऱ्यांसह दोघा उपमहाव्यवस्थापकांनी अपहार केल्याचे उघड झाले आहे़ या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी बँकेच्या या तिन्ही अधिकाऱ्यांवर अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे़
सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शरणपूर रोडवरील बँक आॅफ महाराष्ट्रच्या सोने तारण विभागात शाखा अधिकारी म्हणून संशयित निशा प्रियदर्शिनी, उपमहाव्यवस्थापक अर्चना मगर व जयेश आंबेकर हे तिघे कार्यरत आहेत़ गंगापूररोड परिसरात राहणारे डॉ़ रामनाथ पाटील यांचे शरणपूर रोडवरील बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेत खाते (६०१२६५०७७६) आहे़ पाटील यांनी घरातील २०५़७७ ग्रॅम सोने तारण ठेवून त्यावर कर्ज घेतले होते.
डॉ़ पाटील यांनी बँकेच्या सोने तारण विभागात पाकीट क्रमांक जी / ४३ मध्ये ५ लाख ३१ हजार १३२ रुपयांचे २०५़७७ ग्रॅम सोन्याचे दागिने ठेवले होते़ बॅँकेचे लेखापरीक्षण करताना सोने ठेवलेले पाकीटच न आढळल्याने हा प्रकार उघडकीस आला. बँकेचे शाखा व्यवस्थापक लक्ष्मीकांत बहरराव संगणबटला (५८, रा़ ईशा सोसायटी, भाविकनगर, डीजीपीनगर, गंगापूर) यांनी या विभागाच्या चाव्या संशयित प्रियदर्शिनी, मगर व आंबेकर यांच्याकडे देण्यात आल्या होत्या. त्यामुळे या तिघांवर आरोप ठेवण्यात आला आहे.
शाखा व्यवस्थापक संगणबटला यांना सोने तारण विभागातील डॉ़ पाटील यांच्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन बँकेतील या तिघा कर्मचाऱ्यांविरुद्ध फिर्याद दिली़ या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अहिरे करीत आहेत़ (प्रतिनिधी)

Web Title: Clutter of customer's jewelery by officials of Maharashtra Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.