निमगाव-सिन्नर ग्रामस्थांचे टॅँकर बंद केल्याने हाल
By Admin | Updated: October 24, 2015 22:31 IST2015-10-24T22:29:19+5:302015-10-24T22:31:14+5:30
आरोप : टॅँकर सुरू करण्यास टाळाटाळ

निमगाव-सिन्नर ग्रामस्थांचे टॅँकर बंद केल्याने हाल
सिन्नर : तालुक्यातील निमगाव-सिन्नरला तीन आठवड्यांपासून पिण्याच्या पाण्याच्या टॅँकर बंद केल्याने ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. महिलांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. टॅँकर सुरू करण्यासाठी अधिकाऱ्यांनी पाहणी करून फेरप्रस्ताव सादर केल्यानंतरही टॅँकर सुरू केला जात नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. महसूल अधिकाऱ्यांकडून टॅँकर सुरू करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप सरपंच बाळासाहेब सानप यांनी केला आहे.
निमगाव-सिन्नर येथे तीव्र पाणीटंचाई असल्याने गाव व वाड्यावस्त्यांसाठी सहा टॅँकरच्या फेऱ्या मंजूर होत्या. त्यापैकी दररोज चार खेपा येत होत्या. तथापि, गेल्या महिन्यात थोड्या-फार प्रमाणात झालेल्या पावसानंतर टॅँकर बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यावर सरपंच सानप यांनी तीव्र आक्षेप नोंदविला आहे. गावात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्यानंतरही सिन्नरच्या पर्जन्यमापकाच्या आकडेवारीहून टॅँकर बंद केल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
२ आॅक्टोबर रोजी ग्रामसभेत टॅँकर बंद करण्यात आल्याचा आरोप आला. त्यावेळी ग्रामसभेत पुन्हा टॅँकर सुरू करण्याचा ठराव करण्यात आला. मंडळ अधिकारी, तलाठी व ग्रामसेवकाने पाऊस झाल्यानंतर टॅँकर बंद करण्यासाठी कोणताही अहवाल पाठविलेला नसताना टॅँकर कसा बंद झाला, असा सवाल सानप यांनी उपस्थित केला आहे.
गावात तीव्र पाणीटंचाई असल्याची तक्रार सरपंच सानप यांच्यासह ग्रामस्थांनी आमदार राजाभाऊ वाजे यांच्याकडे केल्यानंतर त्यांनीही तहसलीदार मनोजकुमार खैरनार यांना टॅँकर सुरू करण्याबाबत सूचना केल्या.
तहसीलदार खैरनार यांनी स्वत: निमगाव-सिन्नर येथे पाहणी केली, त्यावेळी महिलांनी त्यांना तीव्र पाणीटंचाईची माहिती दिली. फेरप्रस्ताव पाठविल्यानंतर प्रांताधिकाऱ्यांची स्वाक्षरी झाली नसल्याने टॅँकर सुरू झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे.
तीन आठवठ्यंपासून टॅँकर बंद असल्याने निमगाव-सिन्नर येथील ग्रामस्थांना तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे. गंभीर पाणीटंचाईकडे महसूल अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असल्याची माहिती सरपंच सानप यांनी दिली. (वार्ताहर)
गुरुवारी हंडामोर्चा
निमगाव-सिन्नर येथील ग्रामस्थांना तीन आठवड्यांपासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने महिला संतप्त झाल्या आहेत. येत्या गुरुवारपर्यंत टॅँकर सुरू न झाल्यास तहसील कार्यालयावर हंडामोर्चा काढण्याचा इशारा सरपंच बाळासाहेब सानप यांच्यासह गणेश मुळे, रामनाथ आव्हाड, शिवाजी सानप, मनोहर सानप, परशराम दौंड, शिवाजी सैंद्रे, निवृत्ती सानप यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.