घोरपडे बंधूंसह चौघांना कोठडी
By Admin | Updated: November 30, 2015 23:44 IST2015-11-30T23:41:56+5:302015-11-30T23:44:05+5:30
घोटाळ्यात मुंबईच्या दोघांचा समावेश : फरार नसल्याचा वकिलांचा युक्तिवाद

घोरपडे बंधूंसह चौघांना कोठडी
नाशिक : कोट्यवधी रुपयांच्या रेशन धान्य घोटाळ्यातील गत सहा महिन्यांपासून फरार असलेल्या दोघा घोरपडे बंधूंसह अन्य दोघे संशयित रविवारी वाडीवऱ्हे पोलिसांना शरण आले़ या चौघांनाही विशेष मोक्का न्यायालयाच्या न्यायाधीश ऊर्मिला फलके जोशी यांनी ९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली़ या प्रकरणातील पटेल नामक पाचवा संशयित शनिवारी न्यायालयास शरण आला असून, त्यास ४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे़ तर उर्वरित तिघे संशयित अद्यापही फरार आहेत़
रेशन धान्य घोटाळ्यातील संशयित संपत नामदेव घोरपडे, विश्वास नामदेव घोरपडे (रा़ १० विश्वास बंगला, गोविंदनगर, नाशिक), मगन रतन पवार, रमेश सोमनाथ पाटणकर (दोघेही रा़ शिवशक्ती चौक, सिडको) हे रविवारी वाडीवऱ्हे पोलिसांना शरण आले़ तर पाचवा संशयित लक्ष्मण धरमसी पटेल (रा़ किंगस्टोन बिल्डिंग, कल्याण पश्चिम) हा शनिवारी न्यायालयास शरण आल्याने त्यास ४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ यातील प्रमुख सूत्रधार अरुण नामदेव घोरपडे, त्याची मुलगी पूनम पंकज होळकर (पिंपळगाव बसवंत) व जितूभाई विरजी ठक्कर (रा़ गरिमा टॉवर, ठाणे पश्चिम) हे तिघे फरार आहेत़
विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, घोरपडे बंधूंनी संघटितपणे टोळी तयार करून सरकारी धान्याचा काळाबाजार करून प्रचंड पैसा कमावला आहे़
या काळ्या पैशांच्या व्यवहारासाठी दहा-अकरा बोगस कंपन्या स्थापन करून त्याद्वारे सुमारे १६५ कोटी रुपयांचे व्यवहार करण्यात आले आहेत़ या गुन्ह्णाची पद्धत तपासणी, पत्नी व मुलांच्या नावे केलेल्या संपत्तीचा शोध, तसेच सरकारी अधिकाऱ्यांबरोबरच अन्य आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी व तपासासाठी २० दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली़
संशयितांचे वकील अॅड़ भानोसे, भाटे, देशपांडे यांनी पोलीस तपास पूर्ण झाल्याने कोठडीची गरज नसल्याचे व संशयित फरार झाले नसून जामिनासाठीच्या कायदेशीर तरतुुदींसाठी वेळ लागल्याचे
सांगितले़
यावर अॅड़ मिसर यांनी संशयित फरार झाल्याने याच न्यायालयाने अटक वॉरंट, मालमत्ता जप्तीचे आदेश काढल्याचे तसेच विविध पोलीस ठाण्यांमध्ये हाणामारी, जिवे मारण्याचा प्रयत्न, जमीन व्यवहार फसवणूक व मोक्कान्वये गुन्हा दाखल असल्याचे सांगितले़ यावर न्यायालयाने या चौघा संशयितांना दहा दिवस अर्थात ९ डिसेंबरीपर्यंत पोलीस कोठडीचे आदेश दिले़ (प्रतिनिधी)