सीएट कंपनीत चोवीस तास काम बंद
By Admin | Updated: March 13, 2015 23:24 IST2015-03-13T23:22:53+5:302015-03-13T23:24:06+5:30
सीएट कंपनीत चोवीस तास काम बंद

सीएट कंपनीत चोवीस तास काम बंद
सातपूर : स्वेच्छानिवृत्तीच्या नावाखाली कामगारांवर दबाव टाकून सक्तीची निवृत्ती देण्यात येत असल्याचा आरोप करीत सीएटमधील कामगार संघटनेने शुक्रवारी दुपारनंतर काम बंद आंदोलन सुरू केले असून, शनिवारी दुपारपर्यंत ते चालणार आहे. सुमारे दीड हजार कामगारांच्या या चोवीस तास काम बंद आंदोलनामुळे कारखानाच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम झाला आहे.
सीएट कारखान्यात स्वेच्छानिवृत्ती योजना लागू करण्यात आली आहे. मात्र या योजनेला कामगार अल्प प्रतिसाद देत असून, केवळ १२ कामगारांनीच सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या योजनेत जास्तीत जास्त कामगारांनी सहभागी व्हावे यासाठी व्यवस्थापन विविध मार्गांनी कामगारांवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. गैरहजेरी, बेशिस्त वागणुकीचा ठपका ठेवून कामगारांना नोटिसा बजावल्या जात आहेत. कामगारांना कार्यालयात बोलावून आणि दबाव टाकून नाहक व्यवस्थापन दबाव तंत्राचा वापर करीत आहेत, असा कामगार संघटनेचा आरोप आहे. त्यामुळे या दबावाच्या निषेधार्थ दुपारी साडेतीन वाजता काम आंदोलन सुरू करण्यात आले. शुक्रवारपासून या आंदोलनाला सुरुवात झाली असून, शनिवारी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत हे आंदोलन चालणार आहे, अशी माहिती मुंबई श्रमिक संघाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिली. (वार्ताहर)