निवृत्त सहकाऱ्याकडून लाच स्वीकारणारे लिपिक एसीबीच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:17 IST2021-09-24T04:17:23+5:302021-09-24T04:17:23+5:30
नाशिक : आपल्याच कार्यालयातील निवृत्त सहकाऱ्याकडून लाचेची मागणी करणारे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उत्तर विभाग कार्यकारी अभियंता कार्यालयातील मुख्य ...

निवृत्त सहकाऱ्याकडून लाच स्वीकारणारे लिपिक एसीबीच्या जाळ्यात
नाशिक : आपल्याच कार्यालयातील निवृत्त सहकाऱ्याकडून लाचेची मागणी करणारे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उत्तर विभाग कार्यकारी अभियंता कार्यालयातील मुख्य व वरिष्ठ लिपिकांना १० हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. यात मुख्य लिपिक प्रवीण नामदेव पिंगळे व वरिष्ठ लिपिक लता शांताराम लहाने (बोडके) यांचा समावेश असून, त्यांना निवृत्त कर्मचाऱ्याकडून सेवापुस्तक पडताळणी व रजेच्या फरकाच्या बिलासह अन्य बिलांचे काम करून देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (दि.२३) सापळा रचून पकडले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार बांधकाम विभागातून ३० जुलै २०२१ रोजी सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यांचे सेवापुस्तक पडताळणी व रजेच्या फरकाचे बिल यासह इतर बिलांचे काम करून देण्यासाठी मुख्य लिपिक प्रवीण नामदेव पिंगळे व वरिष्ठ लिपिक लता शांताराम लहाने (बोडके) यांनी त्यांच्याकडून १० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक कार्यालयात तक्रार दिली होती. त्यानुसार एसीबीने पूर्वचौकशी करून सापळा रचून मुख्य लिपिक प्रवीण नामदेव पिंगळे व वरिष्ठ लिपिक लता शांताराम लहाने (बोडके) यांना गुरुवारी लाचेची रक्कम स्वीकारताना पकडल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सतीश भामरे यांनी दिली आहे. दरम्यान, आपल्याच पूर्व सहकाऱ्यांकडून अशा प्रकारे लाचेची मागणी करून स्वीकारण्याचा प्रकार उघडकीस आल्याने शासकीय यंत्रणेतील बोकाळलेला भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.