द्वारका-दत्तमंदिर उड्डाणपुलासाठीच्या निधीचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:19 IST2021-08-20T04:19:38+5:302021-08-20T04:19:38+5:30
खासदार हेमंत गोडसे यांनी या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी केली होती. शहराच्या मध्यवस्तीत द्वारका चौक असून, ...

द्वारका-दत्तमंदिर उड्डाणपुलासाठीच्या निधीचा मार्ग मोकळा
खासदार हेमंत गोडसे यांनी या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी केली होती. शहराच्या मध्यवस्तीत द्वारका चौक असून, या चौकात मुंबई -आग्रारोड आणि नाशिक - पुणे या दोन महामार्गांचा संगम आहे. द्वारका येथून पुणेकडे जाणाऱ्या महामार्गावरुन नाशिकरोड, सिन्नर, शिर्डीकडे मोठ्या प्रमाणावर वाहने जातात. शहरातील सर्वात दाट वाहतुकीचा हा रस्ता आहे. परिणामी द्वारका चौक ते दत्तमंदिर सिग्नल या दरम्यान वाहतुकीची सतत कोंडी होत असते. द्वारका चौकासह बोधलेनगर, गांधीनगर, उपनगर, नेहरूनगर परिसरातही वेळोवेळी वाहतुकीचा खोळंबा होत असल्याने द्वारका चौक ते नाशिकरोडच्या दत्तमंदिर चौकापर्यंत उड्डाणपूल उभारणीचा प्रश्न गेल्या पंधरा वर्षांपासून प्रलंबित होता. यातूनच गडकरी यांनी प्रस्तावित उड्डाणपुलाला तत्त्वत: मान्यता देऊन सुमारे पाचशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र सदर रस्ता हा महानगरपालिका हद्दीत येत असल्याने कामासाठी निधी कोण देणार हा तांत्रिक मुद्दा निर्माण झाला होता. दरम्यानच्या काळात द्वारका - दत्तमंदिर उड्डाणपुलाच्या कामाचा सविस्तर अहवालदेखील तयार करण्यात आला होता. त्यामुळे या रस्त्याचा भारतमाला योजनेत समावेश व्हावा, अशी मागणी करण्यात आली होती.
त्याची दखल घेत गुरुवारी (दि. १९) केंद्रीय मंत्री गडकरी यांनी द्वारका-दत्तमंदिर रस्त्याचा भारतमाला योजनेत समावेश करण्यात आल्याची घोषणा केली आहे. या प्रस्तावित पुलासाठी आता केंद्र सरकारचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून निधी उपलब्ध होणार आहे.