स्वच्छतेच्या खासगीकरणावर फुली
By Admin | Updated: November 21, 2015 00:06 IST2015-11-21T00:05:39+5:302015-11-21T00:06:32+5:30
महासभेने प्रस्ताव फेटाळला : चर्चेपूर्वीच फडकविले पांढरे निशाण

स्वच्छतेच्या खासगीकरणावर फुली
नाशिक : महापालिका हद्दीतील साफसफाई व स्वच्छतेची कामे आउटसोर्सिंगच्या माध्यमातून करून घेण्याचा सुमारे १२ कोटी रुपये खर्चाचा प्रशासनाने ठेवलेला प्रस्ताव महासभेने फेटाळून लावला. सभागृहाने शहर स्वच्छतेच्या खासगीकरणावर फुली मारल्याने रोजंदारीवर कामगार नेमून स्वच्छतेची कामे करण्याचे आदेश महापौरांनी दिले. सुरत दौऱ्यानंतर झालेल्या वातावरणनिर्मितीचे पडसाद महासभेतही उमटले आणि विरोधकांकडून पुढ्यात वाढून ठेवलेल्या युद्धाची चाहूल लागल्याने चर्चेपूर्वीच पांढरे निशाण फडकवत तहाची घोषणा करण्यात आली. दरम्यान, मेघवाळ, मेहतर व वाल्मीकी समाजबांधवांनी महापालिका मुख्यालयात धाव घेत दबावगट निर्माण केल्याने सत्ताधारी मनसेलाही सभागृहाच्या बाजूने उभे राहणे भाग पडले.
महासभेत आयुक्तांनी शहराच्या स्वच्छतेच्या खासगीकरणाचा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवला होता. सदर प्रस्ताव मान्य व्हावा यासाठी प्रशासनाकडून सत्ताधाऱ्यांवर दबाव आणला गेल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून महापालिका वर्तुळात रंगली होती. त्यासाठीच प्रशासनाकडून महासभेपूर्वी घाईघाईने सुरत दौऱ्याची आखणी करण्यात आल्याचे सांगितले जात होते. दरम्यान, सुरत पॅटर्नचे नाव पुढे करून सदर प्रस्ताव मांडण्यात आला असला तरी प्रत्यक्षात सुरत दौऱ्यानंतर पदाधिकाऱ्यांना वस्तुस्थिती समोर आल्याने महासभेपूर्वी प्रस्तावाविरोधात विरोधकांनी दंड थोपटले होते. त्यामुळे महासभेत सदर प्रस्ताव घमासान पाहायला मिळण्याची चिन्हे दिसत होती. शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते यांनी यापूर्वीच सदर प्रस्तावाला विरोधाची भूमिका घेतली होती तर दौऱ्यात सहभागी झालेल्या विरोधीपक्षनेत्या कविता कर्डक यांनीही प्रस्तावाला पक्षाचा ठाम विरोध असल्याचे स्पष्ट केले होते. उपमहापौर गुरुमित बग्गा यांनीही सावध पवित्रा घेत सुरत पॅटर्नमधील चांगल्या बाबी स्वीकारण्यास काहीच हरकत नसल्याचे सांगितले होते. माकपचे गटनेते तानाजी जायभावे यांनीही आपल्या पक्षाची भूमिका ठाम असल्याचे स्पष्ट केले. खासगीकरणाच्या प्रस्तावाविरोधात विरोधक एकवटले असतानाच वाल्मीकी मेघवाळ मेहतर समाज संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने समाजबांधवांसह राजीव गांधी भवन येथे धाव घेतली आणि महापौर, उपमहापौरांची भेट घेत प्रस्ताव रद्द करत समाजातील बेरोजगारांना सेवेत घेण्याची मागणी केली. समाजबांधव मोठ्या संख्येने राजीव गांधी भवन येथे आल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे महापालिकेने अतिरिक्त पोलीस बंदोबस्तही मागवून घेतला होता.
विशेषत: आंदोलकांकडून अनुचित कृती घडण्याची शक्यता लक्षात घेऊन आयुक्तांच्या दालनासमोर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. दरम्यान, सभागृहाबाहेरही प्रस्तावाविरोधात वातावरण पेटले असताना महासभेत सदर प्रस्तावावर चर्चा न करताच महापौर अशोक मुर्तडक यांनी तो फेटाळून लावल्याचे जाहीर केले आणि रोजंदारीवर कामगार नियुक्त करत स्वच्छतेची कामे करून घेण्याचे प्रशासनाला आदेशित केले. महापौरांनी प्रस्ताव फेटाळून लावल्याने हत्यार पाजळून आलेल्या विरोधकांनीही आपल्या तलवारी म्यान केल्या आणि बाके वाजवून महापौरांच्या निर्णयाचे स्वागत केले. महापौरांनी निर्णय दिला त्यावेळी मात्र आयुक्त काही काळ सभागृह सोडून गेले होते. (प्रतिनिधी)