रामकुंड परिसरात स्वच्छता मोहीम
By Admin | Updated: October 2, 2015 23:30 IST2015-10-02T23:28:39+5:302015-10-02T23:30:21+5:30
महापालिका : गांधी जयंतीनिमित्ताने अधिकारी, लोकप्रतिनिधींचा सहभाग

रामकुंड परिसरात स्वच्छता मोहीम
नाशिक : ‘स्वच्छ भारत अभियान’ आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने गोदाघाटावरील रामकुंड परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. याशिवाय सहाही विभागीय कार्यालयांच्या वतीने स्वच्छता अभियान राबवितानाच स्वच्छतेविषयी जनजागृतीही करण्यात आली.
महापालिकेच्या वतीने सकाळी ७.३० वाजता रामकुंडावरील गांधीज्योत येथे महात्मा गांधी यांचे स्मरण करण्यात आले. यावेळी महापौर अशोक मुर्तडक, स्थायी समितीचे सभापती शिवाजी चुंभळे, अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे व आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांच्या हस्ते गांधीज्योत येथे पुष्पमाला अर्पण करण्यात आली. त्यानंतर, रामकुंड परिसरातच महापौरांसह पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी हाती झाडू घेत स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक व सफाई कामगारही सहभागी झाले होते. याशिवाय सहाही विभागीय कार्यालयांच्या वतीने विभागांमध्ये ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबवत स्वच्छतेचा जागर करण्यात आला. यावेळी नागरिकांचेही प्रबोधन करण्यात आले. कॅनडा कॉर्नर येथे आयोजित सायकल रॅलीतही महापौर सहभागी झाले होते. यावेळी आमदार सीमा हिरे उपस्थित होत्या. तसेच त्रिमूर्ती चौकातील पेठे विद्यालयामागील मैदानावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी परिसरातील रहिवासी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)