गणेशवाडी भाजी मार्केटमध्ये दिवसातून दोन वेळा साफसफाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:19 IST2021-08-27T04:19:15+5:302021-08-27T04:19:15+5:30
गंगाघाटावरील भाजी बाजार हटवून तो गणेशवाडी येथील जागेत नेण्यासाठी नाशिक महापालिकेने ही इमारत बांधली असली तरी त्याचा पुरेसा वापर ...

गणेशवाडी भाजी मार्केटमध्ये दिवसातून दोन वेळा साफसफाई
गंगाघाटावरील भाजी बाजार हटवून तो गणेशवाडी येथील जागेत नेण्यासाठी नाशिक महापालिकेने ही इमारत बांधली असली तरी त्याचा पुरेसा वापर होतच नाही. गेल्या वर्षीपासून सकाळी फुल बाजार या ठिकाणी भरतो तसेच काही प्रमाणात भाजी विक्रेतेदेखील व्यवसाय करतात. मात्र, अत्यंत अस्वच्छता तसेच भिकाऱ्यांचा वावर आणि अन्य समस्यांमुळे कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेली ही मंडई प्रत्यक्षात मात्र वापरता येत नाही, अशा तक्रारी आहेत. त्याचीच दखल घेऊन महापौर सतीश कुलकर्णी यांनी बुधवारी (दि. २५) गणेशवाडी येथील मंडईला भेट दिली. या वेळी परिसरातील अस्वच्छता दूर करण्यासाठी दिवसातून दोन वेळा स्वच्छता मोहीम राबविण्याचे तसेच या ठिकाणी होणाऱ्या भुरट्या चेाऱ्या बघता सुरक्षा रक्षक नियुक्त करण्याचे आदेशही महापौरांनी दिले.
या वेळी येथील भाजीविक्रेते व नागरिक यांनी येथील अस्वच्छता तसेच रात्रीच्या वेळी भिकारी व भुरटे चोर यांचे वास्तव्य असल्याने मोठ्या प्रमाणात उपद्रव होत असल्याची तक्रार केली. तर शहराच्या अन्य भागातील रहदारीला अडथळा ठरणारा भाजीबाजार हा एकाच ठिकाणी बसविण्याचे आणि विक्रेत्यांकरिता पिण्याच्या पाण्याचे दोन नळ जोडण्या देण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आठवड्यातून एक दिवस या मंडईत येऊन पाहणी करण्याचे आणि समस्या निराकरण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. या वेळी पंचवटी प्रभागाचे सभापती मच्छिंद्र सानप, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, कार्यकारी अभियंता चंद्रशेखर आहेर, विभागीय अधिकारी महेंद्र पगारे, उप अभियंता निकम, कनिष्ठ अभियंता समीर रकटे, विविध कर विभागाचे भूषण देशमुख हे उपस्थित होते.
फोटो आरवर २५ एनएमसी