‘स्वच्छ घर-गाव’ स्पर्धा

By Admin | Updated: October 5, 2015 22:42 IST2015-10-05T22:41:25+5:302015-10-05T22:42:05+5:30

लोणारवाडी : सहभाग घेणाऱ्या कुटुंबीयांना पारितोषिक

'Clean house-village' competition | ‘स्वच्छ घर-गाव’ स्पर्धा

‘स्वच्छ घर-गाव’ स्पर्धा

सिन्नर : स्वच्छ भारत अभियानात आपले गाव अग्रभागी ठेवण्यासाठी लोणारवाडी ग्रामपंचायत प्रशासनाने अनोखी स्पर्धा आयोजित केली आहे. स्वच्छ घर व गाव स्वच्छ ठेवण्यासाठी योगदान देणाऱ्या कुटुंबीयांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. याबाबतचा ठराव लोणारवाडीकरांनी ग्रामसभेत केला.
लोणारवाडी येथे पार पडलेल्या ग्रामसभेत उपसरपंच राजेंद्र भगत यांनी स्वच्छ भारत अभियानात गावाचे योगदान असावे, यासाठी अभिनव स्पर्धेचा ठराव मांडला. त्यास सर्वांनी सहमती दर्शविली. ‘स्वच्छ घर, स्वच्छ गाव’ स्पर्धेसाठी १ नोव्हेंबर ते २५ जानेवारी हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. २६ जानेवारी २०१६च्या ग्रामसभेत स्वच्छता अभियानात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या कुटुंबाला पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, निर्मलग्राम, पर्यावरण संतुलित योजना आदिंसह शासनाच्या विविध योजनेत लोणारवाडी ग्रामपंचायतीने नेहमीच सक्रीय सहभाग घेतला आहे. गावाच्या स्वच्छतेसाठी व स्वच्छ अभियान यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे.
सरपंच सुमन मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रमासभेत जिल्हा परिषद सदस्य राजेश नवाळे, पंचायत समिती सदस्य प्रकाश कदम, उपसरपंच राजेंद्र भगत, ग्रामसेवक वाय. डी. पापळ, दत्तात्रय मिठे, चंद्रकांत झगडे, जयश्री लोणारे, काशाबाई लोणारे, शंकुतला पोटे, अशोक पवार, विठ्ठल लोणारे, डॉ. सदाशिव लोणारे, आप्पा पवार, श्रीपाद लोणारे, धर्मा मोरे, राजेंद्र मिठे, राजेंद्र माळी, सोमनाथ भगत, योगेश पगर,
नितीन झगडे आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: 'Clean house-village' competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.