मातीसह अन्य पणत्यांनी टाकली कात

By Admin | Updated: November 1, 2015 21:36 IST2015-11-01T21:32:07+5:302015-11-01T21:36:00+5:30

नावीन्यपूर्ण पणत्यांची ग्राहकांना भुरळ

Clay with clay | मातीसह अन्य पणत्यांनी टाकली कात

मातीसह अन्य पणत्यांनी टाकली कात

नाशिक : पारंपरिक मातीच्या पणत्यांप्रमाणेच विविध फॅन्सी, आकर्षक पणत्या बाजारात दाखल झाल्या असून, विविध रंगसंगतीतील पणत्या ग्राहकांना आकर्षित करत आहेत. शहरातील बाजारपेठेत मातीच्या पणत्यांबरोबरच, प्लॅस्टिक, अ‍ॅक्रेलिक, मेटल प्रकारातील पणत्यांची दुकाने थाटली आहेत.
पारंपरिकतेची कास धरत आजही मातीच्या पणत्यांना मोठी मागणी आहे. अलीकडे ग्राहकांना चिनी बनावटीच्या वस्तूंची भुरळ पडलेली असताना पारंपरिक मातीच्या पणत्यांचं रूपडं बदलून ग्राहकांची आवड-निवड जोपासण्याच्या प्रयत्न मातीच्या पणत्या बनवणाऱ्या कारागिरांकडून केला जात आहे. मातीच्या पारंपरिक पणत्यांबरोबरच विविध आकारांतील मातीच्या पणत्यांमध्ये स्वस्तिकच्या आकारातील पणत्या, बांधणीची आकर्षक नक्षी असलेल्या पणत्या, पाच, आठ आणि अकरा पणत्यांचा एकत्रित समूह असणाऱ्या पणत्या, वर्तुळाकृती आकारातील एकावर एक असे तीन थर असलेल्या पणत्या आणि हत्तीने आपल्या सोंडेवर अलगद झेललेल्या पणत्या ग्राहकांना आकर्षित करत
आहेत. मातीच्या पणत्यांपासून थोडा बदल हवा म्हणून अनेक प्लॅस्टिक, अ‍ॅक्रेलिक तसेच काचेच्या पणत्यांची खरेदी करणारा ग्राहक बघायला मिळतो. मातीच्या पणत्यांपेक्षा इतर पणत्या विविध रंगसंगतीमध्ये सहज उपलब्ध होत असल्याने या पणत्यांचे आकर्षक रंग ग्राहकांना आकर्षित करत असल्याचे अनेक पणती विक्रेत्यांनी सांगितले.
इलेक्ट्रिक लाइटच्या माळांचे तंत्रज्ञान वापरून तेल आणि वात यांचा वापर न करता रेडिमेड समई आणि पणत्यादेखील बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. समई, पणत्यांप्रमाणेच उदबत्त्यादेखील ग्राहकांना आकर्षित करत आहेत. (प्रतिनिधी)

चिनी बनावटीच्या वस्तू वापरताना सावधान

दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर शहरात चिनी बनावटीच्या वस्तू दाखल झाल्या असून, या वस्तूंपासून आग लागण्याचे प्रकार, शॉर्टसर्किट असे अपघात उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने अशा वस्तू वापरताना काळजी घेणे आवश्यक आहे.

Web Title: Clay with clay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.