दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी नागरी आघाडीची झाली बिघाडी
By Admin | Updated: January 31, 2017 00:25 IST2017-01-31T00:24:44+5:302017-01-31T00:25:22+5:30
दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी नागरी आघाडीची झाली बिघाडी

दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी नागरी आघाडीची झाली बिघाडी
इतिहास चाळताना
संजय पाठक
नाशिकमध्ये महापालिकेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी जनआघाडीचा प्रयोग करण्याचा फारसा प्रयत्न झाला नाही, परंतु पहिल्या पंचवार्षिक कारकिर्दीतच महापालिकेचा इतका गैरकारभार गाजला की पालिकेत नक्की काय सुरू आहे, असा सुजाण नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला. टक्केवारीचे अर्थकारण, त्यावर झालेले वाद आणि न्यायालयीन दावे यामुळे महापालिका स्थापन होण्यासाठी उत्सुक असलेल्या सुजाण नागरिकांमध्ये चलबिचल सुरू झाली. त्यातून पक्षविरहित नागरी आघाडी सुरू करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार नाशिक नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष (कै.) वसंतराव गुप्ते यांच्यासह काही प्रतिष्ठित नागरिक एकत्र आले. शिंगाडा तलाव येथे प्रारंभी महापालिकेत काय चाललेय याची चर्चा करण्यासाठी बैठक झाली. ज्येष्ठ नाटककार (कै.) वसंतराव कानेटकर यांचेही मार्गदर्शन घेण्यात आले. याच बैठकीत नागरी आघाडीची सूचना काहींनी केली. ही सर्व माहिती गुप्त ठेवावी असेच या बैठकीत ठरविण्यात आले, परंतु ही ‘बातमी’ फुटली आणि गोंधळ उडाला. नागरी आघाडीमध्ये निवडणूक लढविण्यासाठी अनेक इच्छुक तयार झाले. परंतु एका भ्रष्ट प्रकाराला आळा घालण्यासाठी सुरू झालेल्या या प्रकाराला वेगळे वळण लागले किंवा आघाडीच्या उमेदवारांनी काही गैरप्रकार केले तर कसे काय कराचये हा मुद्दा चर्चेत आला. त्यावर बरेच मंथन झाले आणि शहरातील मान्यवरांनीच मग संकल्पना मागे घेतला. ही आघाडी फसल्यानंतर आणखी एक नागरी आघाडी तयार झाली. या आघाडीने काही उमेदवार पुरस्कृत केले, परंतु कोल्हापूर महापालिकेत ज्याप्रमाणे ताराराणी आघाडी उभी राहिली तशी ही आघाडी होऊ शकली नाही. त्यानंतर महापालिकेच्या आजवरच्या इतिहास नागरी आघाडी करण्याच्या चर्चा काही अपक्ष उमेदवार करतात, परंतु त्याला फार चांगले मूर्तस्वरूप प्राप्त झाल्याचे आजवर आढळले नाही.