सावानाच्या कार्यवाहविरुद्ध दिवाणी दावा
By Admin | Updated: October 12, 2016 23:07 IST2016-10-12T22:49:44+5:302016-10-12T23:07:00+5:30
संविद इन्फोटेक : रक्कम देण्यास टाळाटाळ

सावानाच्या कार्यवाहविरुद्ध दिवाणी दावा
नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या देवघेव विभागातील संगणकीय प्रणालीच्या कामकाजात झालेल्या अपहारप्रकरणी माजी कार्यवाह श्रीकांत बेणी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला असतानाच आता प्रणालीचे कामकाज करणाऱ्या संविद इन्फोटेक या पुरवठादार संस्थेने थकीत रक्कम ठरल्यानुसार दिली नाही म्हणून सावानाचे विद्यमान कार्यवाह मिलिंद जहागिरदार यांच्याविरुद्ध न्यायालयात दिवाणी दावा दाखल केला असल्याचे पत्रकान्वये कळविले आहे.
संविद इन्फोटेकचे संचालक मनोज चव्हाणके यांनी याबाबत पत्रकात म्हटले आहे, सावानाने पाच वर्षांपूर्वी रितसर निविदा काढून संविद इन्फोटेक या संस्थेस संगणकीकरणाचे काम दिले होते. संपूर्ण कामाची १४ लाख रुपये किंमत निश्चित करण्यात आली होती. त्यात १.५ लाख पुस्तकांची तपशिलवार संगणकीय नोंद, बारकोडिंग, सभासदांची छायाचित्रासह संगणकीय नोंद व स्मार्टकार्ड करणे आदि कामांचा समावेश होता.
करारनाम्यानुसार सावानाने संस्थेला सात लाख रुपये धनादेशाद्वारे दिले, परंतु संपूर्ण काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित सात लाख रुपये मिळावेत यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही रक्कम दिली गेली नाही. याउलट थकीत रक्कम देण्याऐवजी बेकायदेशीरपणे जळगावच्या एका एजन्सीला काम देण्यात आले. त्यामुळे थकीत रकमेसाठी १५ जून २०१६ रोजीच वाचनालयाचे विद्यमान कार्यवाह मिलिंद जहागिरदार यांच्याविरुद्ध नाशिक न्यायालयात दिवाणी दावा दाखल केला असल्याचे चव्हाणके यांनी म्हटले आहे.
याशिवाय, डाटा चोरीसंदर्भात पोलीस आयुक्तालयातील सायबर गुन्हे तपास शाखेकडेही तक्रार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे चव्हाणके यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)