नागरी समितीचे धरणे आंदोलन
By Admin | Updated: January 11, 2016 22:43 IST2016-01-11T22:40:19+5:302016-01-11T22:43:43+5:30
मागण्यांचे निवेदन : नदीपात्रात मिसळणारे अस्वच्छ पाणी बंद करावे

नागरी समितीचे धरणे आंदोलन
मालेगाव : येथील सार्वजनिक नागरी सुविधा समितीतर्फे शहरातील विविध मागण्यांसाठी अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. समितीतर्फे विविध मागण्यांचे निवेदन अपर जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार किशोर बच्छाव यांना देण्यात आले.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी मोसम नदी सुुधार योजना कार्यरत करावी, नदीपात्रात मिसळणारे अस्वच्छ पाणी बंद करावे, महादेव घाट ते संगमेश्वर पुलाचे काम करावे, साथीच्या आजारांचे निराकरण करावे, मोकाट जनावरे व कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, नियमित व वेळेवर पाणीपुरवठा करावा, वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभाराला पायबंद घालावा, वीज देयकाची रक्कम भरणाऱ्या ग्राहकांचा पुरवठा खंडित करण्याचे प्रकार थांबवावे, अवाच्या सवा देयके येणारे इलेक्ट्रॉनिक मीटर बदलण्यात यावे, कंपनीच्या अधिकाऱ्यांची दादागिरी थांबवावी, वीज देयकांतील घोळ थांबवावा, सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पैसे मागणाऱ्यांवर आळा घालावा, अपंगत्वाच्या दाखल्यासाठी पैशांची मागणी थांबवावी, प्रसूतीसाठी महिलांकडून पैसे घेण्याचे प्रकार थांबवावे, अशा मागण्या केल्या आहेत.
यात महत्त्वाचे म्हणजे येथील महादेव घाट ते संगमेश्वर मंदिरादरम्यानच्या पुलाचे ३ मार्च २०१५ रोजी भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी तत्कालीन आयुक्तांनी नऊ महिन्यांत हा पूल पूर्ण करण्याची ग्वाही दिली होती. मात्र त्यापुढे पुलाची कारवाई सरकलेली नाही. आंदोलनात रामदास बोरसे, हरिप्रसाद गुप्ता, कैलास शर्मा, नेविल तिवारी, पवन पाटील, तेजस जैन, सुरेश बडजाते, जितेंद्र जाधव, मनीष वाणी आदि सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)