महापालिकेच्या सिडकोतील दवाखान्याला घरघर
By Admin | Updated: December 5, 2015 22:37 IST2015-12-05T22:36:35+5:302015-12-05T22:37:28+5:30
नागरिकांमध्ये नाराजी : नगरसेवकांकडून पाहणी; परिसरात कचरा-घाणीचे साम्राज्य, गाजर गवत वाढले

महापालिकेच्या सिडकोतील दवाखान्याला घरघर
नरेंद्र दंडगव्हाळ, सिडको
नाशिक शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश व्हावा, यासाठी महापालिकेच्या वतीने प्रयत्न सुरू असले तरी दुसरीकडे मात्र जुने सिडको येथील महापालिकेच्या दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांची आरोग्य तपासणीची व्यवस्था नाही. दवाखान्याची संपूर्ण पडझड झाली असून, खिडक्यांच्या काचा फुटून मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. रुग्णांची गैरसोय, स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून संपूर्ण दवाखान्यालाच घरघर लागल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. याबाबत प्रभागाच्या शिवसेना नगरसेवक कल्पना पांडे यांनी दवाखान्याची पाहणी करून नाराजी व्यक्त केली.
महापालिकेचा जुने सिडको येथे गेल्या अनेक वर्षांपासून दवाखाना सुरू आहे. या दवाखान्यात जुने सिडकोसह परिसरातील रुग्ण उपचार घेतात. येथे थंडी, ताप, खोकला, लसीकरण, गरोदर माता तपासणी यांसह इतर आजारांवर उपचार केले जातात.
या दवाखान्याची गेल्या अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली असून, याकडे महापालिका लक्ष देत नसल्याचे चित्र बघावयास मिळते. सध्या या दवाखान्याला उतरती कळा लागली आहे. या दवाखान्याचा संपूर्ण परिसर घाण, कचरा तसेच गाजर गवताने वेढलेला आहे. दवाखान्याच्या सर्व खोल्या खराब झाल्या असून, भिंतींना तडे गेले आहेत. यामुळे संपूर्ण परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. या दवाखान्यात गरोदर मातांच्या तपासणीसाठी टेबलच नाही. अशीच परिस्थिती इतर रुग्णांच्या बाबतीत आहे.
रुग्णांसाठी गोळ्या, औषधेही पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत. त्यासाठी कोणतीच व्यवस्था नसल्याने रुग्णांना देण्यात येणारी औषधे खालीच ठेवण्यात आलेली असतात. प्रभागाच्या नगरसेवक कल्पना पांडे यांनी या दवाखान्याची पाहणी केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला असून, यामुळे पांडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.