शहर विकास आराखडा थेट सरकारला होणार सादर
By Admin | Updated: February 5, 2015 00:17 IST2015-02-05T00:16:38+5:302015-02-05T00:17:09+5:30
प्रकाश भुक्ते : पुन्हा महासभेवर मांडणी नाही

शहर विकास आराखडा थेट सरकारला होणार सादर
नाशिक : नव्याने तयार होत असलेला शहर विकास आराखडा महापालिकेच्या महासभेवर मांडला जाणार नसून, तो नागरिकांच्या हरकती-सूचनांनंतर थेट सरकारला सादर केला जाणार असल्याचे आराखडाकार आणि नगररचना उपसंचालक प्रकाश भुक्ते यांनी स्पष्ट केले आहे. भुक्ते यांच्या या खुलाशाने विकास आराखड्याबाबत आता महापालिकेचा कोणताही संबंध उरलेला नसून शासनच त्यावर अंतिम निर्णय जाहीर करणार आहे.
शहर विकास आराखडा फुटल्यानंतर त्यावर महासभेत जोरदार चर्चा होऊन तो फेटाळण्यात आला होता. त्यानंतर शासनाने महापालिकेला आराखड्याचे काम न सोपविता नगररचना उपसंचालक प्रकाश भुक्ते यांच्याकडे नव्याने आराखडा तयार करण्याची जबाबदारी सोपविली. त्यानुसार आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. महापालिकेत भुक्ते यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नगरसेवकांनी सदर आराखडा महासभेवर ठेवण्याची सूचना केली असता भुक्ते यांनी कायदेशीरदृष्ट्या तसे ठेवता येत नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी भुक्ते यांनी सांगितले, आराखडा तयार झाल्यानंतर जनतेच्या हरकती-सूचना मागविल्या जातील. त्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी दिला जाईल. महापालिकेलाही त्यात सूचना व हरकती मांडण्याचा अधिकार आहे. सदर हरकती व सूचना नियोजन समितीकडे छाननीसाठी जाईल. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर उपसंचालक अंतिम निर्णय घेऊन तो सरकारला सादर करतील. कायद्यातील तरतुदींनुसारच आराखडा तयार करण्यात येत असून, तो आता पुन्हा महापालिकेकडे मांडला जाणार नाही. दोन महिन्यांत आराखडा सादर करण्याचे प्रयत्न आहेत. आणखी मुदतवाढ मागितली जाऊ शकते; परंतु अर्धवट स्थितीत कोणतेही काम ठेवले जाणार नसल्याचेही भुक्ते यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)