केबीसीमधील गुंतवणुकीत नगर अग्रभागी
By Admin | Updated: July 23, 2014 00:32 IST2014-07-22T23:08:15+5:302014-07-23T00:32:11+5:30
ठाणे, मुंबईतही धागेदोरे

केबीसीमधील गुंतवणुकीत नगर अग्रभागी
पंचवटी : अल्पावधीतच तिप्पट रकमेचे आमिष दाखवून हजारो सभासदांना गंडविणाऱ्या केबीसी कंपनीतील गुंतवणुकीत अहमदनगर जिल्ह्णातील सभासदांचा सर्वाधिक समावेश असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर जाळे पसरलेल्या या कंपनीचे ठाणे, मुंबई तसेच कल्याणपर्यंत धागेदोरे पसरले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आडगाव पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरापर्यंत जवळपास ५१७० सभासदांनी तक्रारी दाखल केल्या असून, फसवणुकीचा आकडा १४१ कोटी रुपयांपर्यंत गेला आहे. विविध योजनेच्या माध्यमातून केबीसी कंपनीच्या एजंटांनी सभासदांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून लाखो रुपये जमा करून तिप्पट रक्कम देण्याच्या बहाण्याने कंपनीत गुंतविले होते. या गुंतवणुकीत खेडेगावांतील सभासदांचा लक्षणीय सहभाग असून, अहमदनगर जिल्हा गुंतवणुकीत अग्रभागी आहे. पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारींपैकी जवळपास निम्म्याहून अधिक सभासद हे नगर जिल्ह्यातील आहेत.
या कंपनीचे धागेदोरे मुंबई, ठाणे व कल्याणपर्यंत पोहोचलेले असल्याने तेथील एजंटांचाही समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. केबीसी कंपनीचे फरार मुख्य संचालक भाऊसाहेब चव्हाण यांची मेहुणी भारती शिलेदार ही नगर जिल्ह्णाची सूत्रे सांभाळायची. (वार्ताहर)