शहरात जनजीवन सुरळीत
By Admin | Updated: October 11, 2016 01:23 IST2016-10-11T01:22:05+5:302016-10-11T01:23:23+5:30
धाकधूक कायम : दसरा सण असल्याने बाजारपेठ खुली

शहरात जनजीवन सुरळीत
नाशिक : रविवारी दिवसभर चाललेल्या आंदोलनामुळे विस्कळीत झालेले जनजीवन सोमवारी पूर्वपदावर आले. रस्ता वाहतूक सुरळीत होण्याबरोबरच व्यापार, व्यावसायिक प्रतिष्ठाने नियमितपणे खुले झाली. मंगळवारी दसरा सण असल्याकारणाने कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे.
तळेगाव येथे शनिवारी सायंकाळी घडलेल्या घटनेनंतर पसरलेल्या विविध अफवा व त्यानंतर रात्रीपासून सुरू झालेले आंदोलन रविवारी दिवसभर कायम राहिले. संतप्त जमावाने शहराच्या विविध भागात रास्ता रोको आंदोलने केली, तर त्यावर प्रतिक्रिया म्हणून रात्री उशिरा महात्मानगर, कॉलेजरोड आदि भागामध्ये दगडफेकीच्या घटना घडून वाहनांची नासधूस करण्यात आली. परिणामी शहरातील तणाव निवळण्याऐवजी त्यात वाढच झाली. पोलिसांनी रात्री उशिरा समाजकंटकांची धरपकड करण्यास सुरुवात करतानाच, दोन्ही बाजूंनी शांतता व सलोखा राखण्यासाठी बैठका घेऊन वातावरण निवळण्यास मदत केली. परंतु तरीही शहरवासीयांमध्ये सोमवारबाबत धाकधूक होती. शाळा, महाविद्यालयांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचे कारण देत अगोदरच सुटी जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थी, पालक निर्धोक होते. मात्र व्यापार, बाजारपेठ सुरू होण्याविषयी साशंकता कायम असल्याने सकाळी नऊ वाजता व्यावसायिकांनी वातावरणाचा अंदाज घेऊनच हळूहळू दुकाने उघडण्यास सुरुवात केली. याच दरम्यान, पोलिसांची सशस्त्र गस्त कायम असल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला. शहरातील रिक्षा व शहर बसची वाहतूकही टप्पाटप्प्याने सुरू असल्यामुळे नोकरदार, कामगारांना इच्छितस्थळ गाठणे सोयिस्कर झाले. बॅँका, खासगी कार्यालये सुरू झाले, शिवाय उद्या मंगळवारी दसरा असल्याकारणाने सराफ व कपडा मार्केेटदेखील खुले करण्यात आले.