शहर विकास आराखडा संशयास्पद
By Admin | Updated: January 11, 2017 00:30 IST2017-01-11T00:30:12+5:302017-01-11T00:30:31+5:30
दशरथ पाटील : शेतकऱ्यांवर अन्यायाची भावना

शहर विकास आराखडा संशयास्पद
नाशिक : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंजूर करण्यात आलेला विकास आराखडा संभ्रम निर्माण करणारा व संशयास्पद असल्याचा आरोप माजी महापौर दशरथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. या आराखड्यात भूमाफियांच्या पदरात दान टाकत शेतकऱ्यांवर अन्याय केल्याची भावनाही पाटील यांनी व्यक्त केली.
राज्य शासनाने सोमवारी (दि. ९) शहर विकास आराखडा भागश: मंजूर केला. त्याबद्दल माजी महापौर दशरथ पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, शासनाने भागश: आराखडा प्रसिद्ध करत निवडणुकीच्या दृष्टीने चाचपणी चालविली आहे. सदर आराखडा महापालिका व शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. या आराखड्यात दसक-पंचक येथे एका पुढाऱ्याच्या जागेवरचे आरक्षण हटविण्यात आले आहे, तर मखमलाबाद येथे शाळा, दवाखाना यांचे आरक्षण हटविण्यात येऊन ते भूमाफियांना खुले केले आहे. तब्बल १२ टक्के आरक्षणे ही शेतकऱ्यांच्या जमिनींवर टाकण्यात आलेली आहेत. त्याबाबत कुठलेही खुलासे करण्यात आलेले नाहीत. अनेक डीपीरोड काढून टाकण्यात आले आहेत तर कुठे रस्त्यांची रुंदी कमी करण्यात आली आहे. ही आरक्षणे नेमकी कशासाठी व कोणाकरिता काढली याची सखोल चौकशी करण्याची मागणीही दशरथ पाटील यांनी केली आहे. अनेक आरक्षणे हटवत रहिवासी क्षेत्र दर्शविण्यात आले आहे. सदर रहिवास क्षेत्र कुणाच्या फायद्यासाठी करण्यात आले, असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला.