वडाळा रस्त्यावर धावली शहर बस...

By Admin | Updated: September 12, 2015 23:15 IST2015-09-12T23:14:27+5:302015-09-12T23:15:00+5:30

अनवधान : बस दिसताच अनेकांच्या भुवया उंचावल्या

City buses run on the Wadala road ... | वडाळा रस्त्यावर धावली शहर बस...

वडाळा रस्त्यावर धावली शहर बस...

नाशिक : पालिका हद्दीतील वडाळागावात गेल्या पंधरा वर्षांपासून बससेवा बंद पडली आहे. मात्र, आज अचानकपणे दुपारच्या सुमारास वडाळागावच्या रस्त्यावरून शहर बस जात असल्याचे
बघून अनेकांच्या भुवया
उंचावल्या.
वडाळागाव हे पालिका हद्दीमधीलच. शहरापासून अवघ्या पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात पंधरा वर्षांपासून बंद पडलेली शहर बससेवा अद्याप सुरू होऊ शकलेली नाही. हे एकमेव असे गाव आहे जेथे एस.टी. पोहोचलेली नाही. त्यामुळे नागरिकांबरोबरच विद्यार्थी वर्गाची दिवसेंदिवस मोठी गैरसोय होत आहे. मात्र महामंडळाला अद्याप या गावासाठी बससेवा सुरू करण्याचा ‘मुहूर्त’ मिळत नसल्याने
कुंभमेळ्यामध्येही वडाळा बससेवेपासून वंचित होता.
आज (दि.१२) दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास चक्क वडाळा रस्त्यावरून शहर बस गावाकडे येत असल्याचे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. नागजीमार्गे निमाणीवरून सुटलेली दुपारी बारा वाजेची पाथर्डीगाव बस ही वडाळा-इंदिरानगर-पाथर्डी रस्त्यावरून जाण्याऐवजी शिवाजीवाडी येथून वडाळा रस्त्याने थेट वडाळागाव चौफुलीपर्यंत आली. वाहनचालकाच्या अनवधानामुळे
का होईना; मात्र अनेक वर्षांनंतर वडाळा रस्त्यावर यानिमित्ताने ग्रामस्थांना ‘एसटी’चे दर्शन
घडले. (प्रतिनिधी)

शहर बससेवेची उणीव

गाव झपाट्याने विकसित झाले असून, एखाद्या महामार्गाला लाजवेल, असा या गावाचा रस्ता वर्षभरापूर्वी महापालिकेच्या वतीने तयार करण्यात आला आहे. अशोका मार्ग कॉर्नरपासून तर थेट वडाळागाव परिसरापर्यंत नवनवीन कॉलन्या उदयास आल्या आहेत. लोकवस्ती वाढत आहे. वडाळागावाची लोकसंख्याही पंधरा वर्षांपूर्वीच्या तुलनेत साहजिकच वाढली आहे. त्यामुळे या गावाला शहर बससेवेची उणीव प्रकर्षाने जाणवत आहे. राज्य परिवहन महामंडळाने याबाबत विचार करणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांकडून केले जात आहे.

Web Title: City buses run on the Wadala road ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.