सीसीटीव्हींसाठी पोलिसांवर निविदा मुदतवाढीची नामुष्की
By Admin | Updated: March 18, 2015 00:31 IST2015-03-18T00:29:16+5:302015-03-18T00:31:52+5:30
कुंभमेळा : पोलिसांच्या नाकर्तेपणाचा प्रश्न थेट विधानसभेत

सीसीटीव्हींसाठी पोलिसांवर निविदा मुदतवाढीची नामुष्की
नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात कायमस्वरूपी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची सूचना करूनही तात्पुरते सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या पोलिसांच्या दुराग्रहाबाबत थेट विधानसभेत जाब विचारण्याचा निर्णय लोकप्रतिनिधींनी घेतला असून, यासंदर्भात तारांकित प्रश्नही उपस्थित केला आहे़ दरम्यान, नाशिक शहरात लावण्यात येणाऱ्या सुमारे ३४८ सीसीटीव्हींसाठी दुसऱ्यांदा निविदा काढण्याची नामुष्की पोलिसांवर आली आहे़ यामुळे चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या कुंभमेळ्यात सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशा सीसीटीव्हींचा प्रश्न आणखी किती काळ रेंगाळणार याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत़
सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला असून ध्वजारोहण १४ जुलै २०१५, प्रथम शाहीस्रान २९ आॅगस्ट, द्वितीय शाहीस्रान १३ सप्टेंबर तर तृतीय शाहीस्रान १८ सप्टेंबरला आहे़ या कालावधीत नाशिकला येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या अशा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा प्रश्न अजूनही मार्गी लागलेला नाही़ कायमस्वरूपी वा भाडेतत्त्वावरील कॅमेऱ्यांच्या खर्चाबाबत विशेष तफावत नसल्याचे समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक शहरातील दौऱ्यांमध्ये कायमस्वरूपी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे अनेकदा सुतोवाच केले होते़ मात्र मुख्यमंत्र्याच्या या आदेशाला बगल देणारी भाडेतत्त्वावरील सीसीटीव्हीची निविदा पोलिसांना प्रसिद्ध केली़
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये बसविण्यात येणाऱ्या भाडेतत्त्वावरील सीसीटीव्ही यंत्रणेबाबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदांमध्ये त्र्यंबकेश्वरच्या निविदेस तीन ठेकेदारांनी प्रतिसाद दिला मात्र नाशिक शहरासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदेस पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने मुदतवाढीची नामुष्की पोलिसांवर ओढवली आहे़ त्र्यंबकेश्वरसाठी प्रतिसाद मिळतो मात्र नाशिकसाठी नाही यामागचे कारण काय असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित केला जातो आहे़ शहरातील सुमारे ३४८ ठिकाणी हे सीसीटीव्ही कॅमेरे १५ जून ते ३० आॅक्टोबर अशा साडेचार महिन्यांच्या कालावधीसाठी बसविण्यात येणार आहेत़ दरम्यान पोलिसांनी दुसऱ्यांदा मुदतवाढ दिलेल्या निविदा भरण्याचा मंगळवारी (दि़१७) शेवटचा दिवस होता. शहरातील सीसीटीव्ही यंत्रणेबाबत बुधवारी (दि. १८) पोलीस आयुक्तालयात बैठक होणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. (प्रतिनिधी)