निकृष्ट अन् अपुऱ्या रस्त्यांच्या कामांना नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:18 IST2021-08-28T04:18:22+5:302021-08-28T04:18:22+5:30
दिंडोरी : तालुक्यातील रस्त्यांच्या निकृष्ट व अपुरे कामे अन दुरवस्थेबाबत दिंडोरी तालुक्याच्या दौऱ्यावर आलेल्या पंचायत राज ...

निकृष्ट अन् अपुऱ्या रस्त्यांच्या कामांना नागरिक त्रस्त
दिंडोरी : तालुक्यातील रस्त्यांच्या निकृष्ट व अपुरे कामे अन दुरवस्थेबाबत दिंडोरी तालुक्याच्या दौऱ्यावर आलेल्या पंचायत राज समितीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उपजिल्हाध्यक्ष मनोज ढिकले व पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, दिंडोरी तालुक्यातील रस्त्यांची अत्यंत वाईट दुरवस्था झाली आहे. तालुक्यातील जनता खराब रस्त्यांमुळे त्रस्त झाली आहे. दिंडोरी या तालुक्याच्या मुख्यालयाला जोडणाऱ्या दिंडोरी-पिंपळगाव, दिंडोरी-खेडगाव, दिंडोरी-भनवड, दिंडोरी-ननाशी, दिंडोरी-उमराळे, दिंडोरी-ओझर इ. या सर्वच रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली असून याबाबत गेल्या ३ वर्षांपासून अनेकदा निवेदने, आंदोलने करून झाली. परंतु प्रशासनाने याकडे कायम दुर्लक्ष केल्याने जनता हतबल झाली आहे. दिंडोरी- पिंपळगाव (व्हाया पालखेड, जोपुळ) व वरखेडा-कादवा कारखाना या रस्त्यांचे मागच्या वर्षी काम झाले; परंतु सदरहू काम अत्यंत नित्कृष्ट दर्जाचे होते. सदर रस्त्यांना सिलकोट करण्यात आले नाही, साईड पट्टी करण्यात आली नाही, निविदेत नमूद केल्याप्रमाणे काम न झाल्याने सदरहू रस्ते हे चार महिन्यांच्या आतच खराब झाले. तालुक्यातील सर्व रस्त्यांची उत्कृष्ट कामे करून तालुक्यातील जनतेला दळणवळणासाठी दिलासा मिळावा. अन्यथा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे पद्धतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष मनोज ढिकले, तालुकाध्यक्ष अमोल उगले, गोपीनाथ वाघ, रोशन जाधव, अभिजित राऊत, रोशन दिवटे, मिथुन वाघ, शेखर सांगळे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
--------------
अधिकाऱ्यांची मिलीजुली
खराब रस्त्यांबाबत तक्रार करूनही संबंधित अधिकारी ठेकेदार यांच्या मिलीजुलीने सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या रस्त्यांच्या कामाची व तालुक्यातील इतर रस्त्यांच्या कामाची चौकशी होऊन संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. त्याचप्रमाणे अधिकारी व ठेकेदार यांच्या अभद्र युतीने तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.