नागरिकांची नव्या नोटांसाठी धावाधाव
By Admin | Updated: November 16, 2016 00:48 IST2016-11-16T00:50:07+5:302016-11-16T00:48:24+5:30
नागरिकांची नव्या नोटांसाठी धावाधाव

नागरिकांची नव्या नोटांसाठी धावाधाव
विंचूर : नोटा रद्दच्या निर्णयाने गोरगरीब जनतेबरोबरच मध्यमवर्गीय जनतेचे गेल्या आठ दिवसांपासून हाल सुरू आहेत. काबाडकष्ट करून जमवून ठेवलेल्या नोटा बदलण्यासाठी लोकांची एकच धावपळ उडाली आहे. कामधंदा सोडून गेल्या काही दिवसांपासून बॅँकांच्या रांगेत लोकांना तिष्ठत उभे राहावे लागत आहे. बँकांसमोर लोकांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत. सर्वसामान्य जनतेची पैशासाठी अडवणूक होऊ नये यासाठी रविवारीदेखील बँका सुरू होत्या. यामध्ये बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. सोमवारी गुरू नानक जयंतीनिमित्त शासकीय सुटी असल्याने बॅँका बंद होत्या. मंगळवारी सकाळपासूनच बँकांसमोर पुन्हा तोबा गर्दी उसळल्याचे चित्र दिसून आले. सुट्या पैशांअभावी दुकानदारांकडून दोन हजाराची नोट स्वीकारण्यास टाळाटाळ केली जात असल्याची तक्र ार नागरिकांकडून केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. दुकानात गेल्यावर ग्राहक माल खरेदी केल्यानंतर दोन हजाराची नोट देतात. सध्याच्या परिस्थितीत ग्राहकाला एवढे सुटे पैसे कोठून आणायचे, असा रास्त सवाल दुकानदार करतानाचे चित्र आहे. दोन हजार रु पयांची नोट चलनात आणली असली तरीही नागरिकांना दिलासा मिळाला नसल्याचे दिसून आले. त्याऐवजी ५०० रुपयांच्या नोटा मुबलक प्रमाणात चलनात आणणे गरजेचे होते, अशा प्रतिक्रि या व्यावसायिकांकडून दिल्या जात आहेत. खात्यातून पैसे काढण्याची तसेच नोटा बदलून देण्याची मर्यादा वाढविल्याने जनतेला थोडाफार दिलासा मिळाला आहे. ग्राहकाने पाचशे व हजाराच्या नोटा दिल्यास नोटेवर ग्राहकाच्या सह्या घेण्याचा फंडा एका गॅस एजन्सीने अवलंबिला आहे. जुन्या पाचशे व हजाराच्या नोटा बंद करण्यात आल्या असल्या तरी 30 डिसेंबरपर्यंत त्या बँकांत स्वीकारल्या जाणार आहेत. मात्र नोटा बंद झाल्याच्या निर्णयानंतर बहुतांशी दुकानदार जुन्या नोटा घेण्यास नकार देत आहेत. वास्तविक ग्राहकांकडून नोटा स्वीकारून दुकानदार त्या नोटा बॅँकेत आपल्या खात्यात जमा करू शकतात. मात्र अनेक दुकानदारांकडून नोटा स्वीकारल्या जात नसल्याने ग्राहकांचे हाल होत आहेत. नोटा बदलण्यासाठी बँकेत जावे तर बँकेत दोन दोन तास उभे राहूनही नंबर लागत नसल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे. पाचशे हजारच्या नोटा बॅँकेत जमा करण्याची डिसेंबरच्या अखेरपर्यंत मुदत असूनही लोकांनी बॅँकेत एकाचवेळी गर्दी केल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.