नोंदणी कामावर सिडकोतील दोनशे शिक्षकांचा बहिष्कार
By Admin | Updated: October 9, 2015 23:11 IST2015-10-09T23:10:29+5:302015-10-09T23:11:15+5:30
नोंदणी कामावर सिडकोतील दोनशे शिक्षकांचा बहिष्कार

नोंदणी कामावर सिडकोतील दोनशे शिक्षकांचा बहिष्कार
सिडको : लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्यासाठी जनगणना क्षेत्रीय प्रगणक म्हणून शिक्षकांची नेमणूक करण्यात आली असून या कामास शुक्रवारी सिडकोतील मनपा तसेच खासगी शाळांमधील सुमारे दोनशे शिक्षकांनी बहिष्कार टाकला.
सहनिबंधक नागरिक नोंदणी जनगणना संचालनालय, महाराष्ट्र यांच्या वतीने राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्यासाठी जनगणना क्षेत्रीय प्रगणक म्हणून शहरातील मनपा तसेच खासगी शाळांमधील शिक्षकांची नियुक्ती करणयात आली आहे. यासंदर्भात शुक्रवारी सिडकोतील सुमारे दोनशे शिक्षकांना प्रशिक्षणाबाबत मनपाच्या गणेश चौक हायस्कूलमध्ये बोलविण्यात आले होते. या ठिकाणी सर्व शिक्षक जमा झाले परंतु सर्वच शिक्षकांनी या कामास विरोध दर्शविला. या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शिक्षक विभाग संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष जिभाऊ अहिरे, राजेंद्र म्हसदे, दीपक पगार, हरिश्चंद्र भोये, चंद्रकांत गायकवाड, दाभाडे, बी. एस. सातपुते आदि सहभागी झाले होते. शिक्षकांना राष्ट्रीय गुणवत्ता विकास कार्यक्रम, पायाभूत चाचणी परीक्षा, सहामाही परीक्षा, आॅनलाइनची कामे याबरोबरच विद्यार्थ्यांचा दैनंदिन अभ्यास घेणे आदि कामे करावी लागत असतानाच ही सर्व कामे सांभाळून जनगणना क्षेत्रीय प्रगणक म्हणून काम करणे जिकिरीचे होते. यामुळेच या कामास विरोध करण्यात येत असल्याचे जिभाऊ अहिरे यांनी सांगितले.
दरम्यान दोनशे शिक्षकांनी प्रशिक्षणास बहिष्कार टाकल्याने याबाबत वरिष्ठांना कळविण्यात येणार असल्याचे विभागीय अधिकारी आर. आर. गोसावी यांनी सांगितले. (वार्ताहर)