सिटीस्कॅन मशीन आजपासून होणार कार्यान्वित
By Admin | Updated: March 1, 2017 00:23 IST2017-03-01T00:23:00+5:302017-03-01T00:23:14+5:30
नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयाला मिळालेल्या सिटीस्कॅन मशीनचे जोडणी पूर्ण झाली असून, बुधवारपासून (दि़१) सुरू होणार असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ गजानन होले यांनी दिली आहे़

सिटीस्कॅन मशीन आजपासून होणार कार्यान्वित
नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयाला मिळालेल्या सिटीस्कॅन मशीनचे जोडणी पूर्ण झाली असून, बुधवारपासून (दि़१) सुरू होणार असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ गजानन होले यांनी दिली आहे़ गत अनेक वर्षांपासून जिल्हा रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन बंद असल्याने रुग्णांना विभागीय संदर्भ रुग्णालयात पाठविण्यात येत होते़ दरम्यान, या सेवेमुळे गरीब रुग्णांची मोठी सोय होणार आहे़ जिल्हा रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन जुलै-२०११ पासून बंद पडले होते. दहा वर्षांपूर्वी सुमारे दोन कोटी रुपयांचे सिटीस्कॅन मशीन बसविण्यात आले होते, मात्र त्याची मुदत संपल्याने ते निकामी झाले़ शहर व जिल्ह्यातील वाढती अपघातांची संख्या लक्षात घेता जिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅनची आवश्यकता होती़ मात्र, मशीन बंद असल्याने रुग्णांना शालिमार येथील शासकीय संदर्भ सेवा रुग्णालयात पाठविले जाते, तर काही रुग्ण खासगी दवाखान्याचा पर्याय निवडतात, मात्र सर्वांनाच हा खर्च करणे शक्य होत नाही़ जिल्हा रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीनचा प्रश्न निकाली निघाल्याने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ सुरेश जगदाळे यांनी शासनाचे आभार मानले आहेत़ जिल्हा रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन सुरू होण्यामुळे गरिबांना कमी खर्चात आपल्या आजाराचे निदान करता येणार आहे़ तसेच संदर्भ रुग्णालयावरील ताणही कमी होण्यास मदत होणार आहे़