Cilantro added 90 rupees; Green house | कोथिंबीर ९० रुपये जुडी; पालेभाज्या महागल्या
कोथिंबीर ९० रुपये जुडी; पालेभाज्या महागल्या

पंचवटी : गुजरात राज्यासह मुंबई तसेच पुणे बाजार समितीत कोथिंबीर मालाची मागणी वाढल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीरचे बाजारभाव तेजीत आले आहे. सोमवारी सायंकाळी झालेल्या लिलावात कोथिंबीर प्रतिजुडीला ९० रुपये असा बाजारभाव मिळाला. कोथिंबीर पाठोपाठ मेथी ६० रुपये तर कांदापात ३६ व शेपू ३५ रुपये प्रति जुडी दराने विक्री झाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली आहे.
पावसाळा सुरू झाला असला तरी पावसाने दमदारपणे हजेरी लावलेली नाही. त्यामुळे शेतातील उभ्या पिकांना पाणी कमी पडत आहे. नाशिक जिल्ह्यात कोथिंबीर मालाचे उत्पादन बऱ्यापैकी असून, दैनंदिन बाजार समितीत कोथिंबीर विक्रीसाठी दाखल होत आहे. गुजरात राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोथिंबीरला मागणी वाढली आहे. त्यातच परजिल्ह्यातील बाजारपेठेत कोथिंबीर कमी पडल्याने नाशिकमधून मोठ्या प्रमाणात कोथिंबीर मालाची निर्यात केली जात आहे. मुंबई पाठोपाठ पुणे जिल्ह्यातही नाशिक बाजार समितीतून कोथिंबीर निर्यात केली जात आहे. त्यामुळे परबाजारपेठेत मागणी वाढल्याने बाजारभाव तेजीत आले आहेत, असे व्यापारी नितीन लासुरे यांनी सांगितले. चालू वर्षी कोथिंबीर बाजारभावाने ९० रुपये बाजारभाव गाठला असला तरी आगामी कालावधीत उत्पादन घटले तर बाजारभाव तेजीत येण्याची शक्यता असल्याचे बाजार समिती सूत्रांनी सांगितले.


Web Title: Cilantro added 90 rupees; Green house
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.