जिल्हा रुग्णालयातकैद्यांना सिगारेट अन् विड्या
By Admin | Updated: July 28, 2016 01:36 IST2016-07-28T01:28:47+5:302016-07-28T01:36:00+5:30
धक्कादायक : सुरक्षिततेचे तीनतेरा; हुल्लडबाजी आणि पाठलाग

जिल्हा रुग्णालयातकैद्यांना सिगारेट अन् विड्या
नाशिक : वेळ दुपारी सव्वाचारची... जिल्हा रुग्णालयात कैद्यांना घेऊन पोलिसांची गाडी दाखल होते... गाडीभोवती जमावाकडून गराडा घातला जातो... बंदोबस्तात कैद्यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेले जाते. कैद्यांचे ‘शौक’ पूर्ण करण्याची तयारी हितचिंतक तत्काळ सुरू करतात. गुटखा, सिगारेट, विड्या, तंबाखूच्या पुड्या वगैरेंनी पिशव्या भरल्या जातात. कैदी येताच त्यांच्याभोवती गर्दी वाढते. याचवेळी कैदी गाडीत चढत असताना व्यसनाच्या सर्व खाद्याच्या पिशव्या राजरोसपणे पोलिसांच्या समक्षच त्यांच्याकडे सुपूर्द केल्या जातात. जणू भेटीसाठी जमल्याचा आव आणत गाडी रोखली जाते. तब्बल वीस मिनिटांनी गाडी बाहेर निघाली आणि ‘द्वारका’ ओलांडताच गाडीमधून धुराचे लोट बाहेर येऊ लागल्याचे चित्र दिसून आले.....
नाशिकरोड कारागृह पोलीस आणि स्थानिक बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांचे वाभाडे काढणारी घटना बुधवारी घडली.
मध्यवर्ती कारागृहात अनेकदा कैद्यांकडे अमली पदार्थ आढळून आल्याच्या घटना यापूर्वी उघडकीस आल्या आहेत. तुरुंगात कैद्यांकडे अमली पदार्थ येतात कसे, हा यक्ष प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. मध्यंतरी जिल्हा न्यायालयात कैद्यांना अशाच प्रकारे पाण्याच्या बाटलीतून छुप्या पद्धतीने मद्य देण्याचा प्रकार चर्चेत आला होता. त्यानंतर अनेक घटनांमध्ये कैदी न्यायालयातून परत आल्यानंतर कारागृहाच्या प्रवेशद्वारावर घेण्यात आलेल्या अंगझडतीत चपलांमध्ये गांजा सापडल्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र, न्यायालयातच नव्हे तर प्रकृती तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल होणाऱ्या व्यसनी कैद्यांना अशी रसद पुरवल्याचे बुधवारच्या घटनेने स्पष्ट झाले आहे.