सिडकोत भूमिगत जलकुंभ

By Admin | Updated: July 26, 2016 00:11 IST2016-07-26T00:09:46+5:302016-07-26T00:11:22+5:30

प्रभाग ४७ : सात हजार नागरिकांना होणार पाणीपुरवठा

Cidkot Underground Jalkumba | सिडकोत भूमिगत जलकुंभ

सिडकोत भूमिगत जलकुंभ

 नरेंद्र दंडगव्हाळ  सिडको
नाशिक शहरात गेल्या काही वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत असून, यंदाच्या वर्षी तर धरणातील पाणीसाठा अत्यंत कमी झाल्याने संपूर्ण शहरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात करण्यात आली होती. भविष्यात नागरिकांना पाणीटंचाई जाणवू नये, यासाठी सिडकोतील शिवसेना नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी प्रभागात भूमिगत जलकुंभाची संकल्पना साकारली असून, यामुळे प्रभागाचा पाणीप्रश्न कायमचा मिटणार आहे.
सिडकोतील प्रभाग क्रमांक ४७ मध्ये सुमारे १० लक्ष लिटर क्षमतेचा भूमिगत जलकुंभ उभारण्यात आला आहे. सिडको भागात कायमच पाणीपुरवठा कमी दाबाने होणे, अनेकदा पाणीपुरवठाच न होणे अशा कारणांनी पाणीप्रश्न गाजत असतो. यंदाच्या वर्षी तर धरणातील पाणीसाठाच कमी झाल्याने मनपाच्या वतीने संपूर्ण नाशिक शहरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात करण्यात आली होती. पावसामुळे धरणसाठ्यात वाढ झाल्याने ती रद्द करण्यात आली असली तरी भविष्यातही पाणीप्रश्नासाठी नगरसेवकांना झटावे लागणार आहे. सिडकोतील प्रभाग क्रमांक ४७ मधील नागरिकांना यापुढील काळात पाणीपुरवठा सुरळीत व जादा दाबाने होण्यास मदत मिळणार असून, महापालिकेच्या वतीने या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली होती.
भूमिगत जलकुंभामुळे नागरिकांना जादा दाबाने पाणीपुरवठा होणार असून, ज्या भागात कमी दाबाने तो होत असेल, अशा भागातील नागरिकांनाही जादा दाबाने पाणी मिळण्यास मदत होणार आहे. सदरच्या भूमिगत जलकुंभात बारा बंगला पंपिंग स्टेशन येथून थेट पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सिडकोसह संपूर्ण शहरातील जलकुंभात रात्रीच्या वेळी पाणीपुरवठा केला जातो. यानंतर जलकुंभ भरल्यानंतर नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. रात्रीच्या वेळी बारा बंगला पंपिंग स्टेशन येथे तांत्रिक बिघाड झाल्यास दुसऱ्या दिवशी नागरिकांचा पाणीपुरवठा विस्कळीत होतो, परंतु अशाही परिस्थितीत या भूमिगत जलकुंभातून प्रभागात पाणीपुरवठा करण्यात येऊ शकतो. म्हणजे तांत्रिक बिघाडामुळे जरी इतर भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला, तरी येथील पाणीपुरवठा सुरळीत राहणार असून याचा नागरिकांना फायदा होणार आहे. विशेष म्हणजे जमिनीच्या वर जलकुंभ उभारण्यासाठी सुमारे एक कोटीचा खर्च येत असून, भूमिगत जलकुंभासाठी साठ लाखांच्या आसपास खर्च येत असल्याने यातून मनपाच्या निधीतही बचत होण्यास मदत होणार आहे.

Web Title: Cidkot Underground Jalkumba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.